पिंपरी (Pclive7.com):- नुकत्याच झालेल्या मावळ लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मतदारांना पैसे वाटप केल्याप्रकरणी पिंपरी विधानसभेचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी आमदार बनसोडे यांच्याकडून करण्यात आलेले हे कृत्य म्हणजे लोकशाहीचा गळा घोटल्या प्रमाणेच आहे. म्हणूनच निवडणूक विभागाने अण्णा बनसोडे यांच्यावर यापुढे निवडणूक लढवण्याची बंदी घालावी, अशी मागणी शिवशाही व्यापारी संघाचे अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली आहे.
याप्रकरणी युवराज दाखले यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यात म्हटले आहे की, मावळ लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी मतदार राजाला विकत घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचे सिध्द झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी आमदाराकडून अशा प्रकारे पैसे वाटप करणे, म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेतून अधिकाराचा म्हणजेच लोकशाहीचा गळा घोटल्या प्रमाणे आहे.
त्यामुळे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तात्काळ गंभीरपणे दखल घेऊन, अण्णा बनसोडे यांना निवडणुक लढविण्यासाठी अपाञ ठरविण्यात यावे, ही विनंती अन्यथा निवडणुक आयोगाच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशारा युवराज दाखले यांनी दिला आहे.