पिंपरी (Pclive7.com):- पुणे-मुंबई महामार्गावर बाणेर येथे हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ३५ लाख ८८ हजार रुपये किंमतीचा दीडशे किलो गांजा पकडला. हा गांजा विक्रीसाठी घेऊन जात असताना अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना सापळा रचून अटक केली. योगेश दत्तात्रय जोध (वय २८ वर्षे, रा.७७ चंदननगर जुळे सोलापूर, डी-मार्ट जवळ जि. सोलापूर) व सागर दिगंबर कदम (वय २८ वर्षे, वामननगर, जुळे सोलापूर, जि.सोलापूर) असे या अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत बाणेर येथे पुणे-मुंबई सर्व्हिस रोडवर दोघेजण गांजा विक्री करिता आल्याची माहिती पोलीस हवालदार राजन महाडिक यांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी त्यांच्या स्टाफसह त्याठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यावेळी विक्रीसाठी आणलेला ३५ लाख ८८ हजार रुपये किंमतीचा दीडशे किलो वजनाचा गांजा त्यांच्याकडून जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत महाले, पोलीस हवालदार राजन महाडिक, राजेंद्र बांबळे, प्रदीप शेलार, पोलीस नाईक, दिनकर भुजबळ, संतोष दिघे, पोलीस शिपाई दादा धस, प्रसाद जंगीलवाडी, अशोक गारगोटे, शैलेश मगर, प्रदीप गुट्टे व महिला पोलीस शिपाई अनिता यादव यांनी केली. याप्रकरणी पुढील तपास अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक वसंत मुळे हे करत आहेत.





















Join Our Whatsapp Group