पिंपरी (Pclive7.com):- लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजप-आरपीआय यांच्यात महायुती झाली आहे. पिंपरी विधानसभे शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार हे विद्यमान आमदार आहेत. गेल्या पाच वर्षात या मतदारसंघात त्यांनी केलेले काम अतिशय चांगले आहे. लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी मताधिक्य मिळवून देण्याचे काम केले आहे. त्यामुळे येत्या विधानसभेत सुद्धा पिंपरीची जागा ही निश्चितपणे शिवसेनेकडेच राहिल असा विश्वास मावळ लोकसभेचे शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे यांनी बोलताना व्यक्त केला.
पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार श्रीरंग बारणे बोलत होते त्यावेळी यावेळी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला शहरसंघटिका उर्मिला काळभोर, पिंपरी विधानसभा प्रमुख, नगरसेवक प्रमोद कुटे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, नगरसेविका रेखा दर्शले, अनिता तुतारे, माधव मुळे, बशीर सुतार आदी उपस्थित होते.
मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा २ लाखाहून अधिक मताधिक्क्याने पराभव केला. या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या विकासाचा झंझावात तसेच जनता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी राहिली. शिवसेना-भाजप आरपीआय महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. या सर्वांच्या मुळेच मला मोठ्या मताधिक्क्यांनी विजय मिळवता आला. मागील पाच वर्षात केलेल्या कामाला लोकांनी पसंती दिली आहे. विकास कामांच्या माध्यमातून माझी जनतेशी नाळ जोडली गेली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचा पैसा या निवडणुकीत कामी आला नाही. माझी लढाई ही पार्थ पवार यांच्याशी नसून थेट अजित पवार अशी झाली होती. या मतदारसंघात पवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. हयातीत जेवढे फोन केले नसतील, तेवढे फोन प्रत्येक पक्षातील नेत्याला, कार्यकर्त्याला स्वतः अजित पवार यांनी केले होते. या मतदारसंघात अक्षरश: त्यांनी तळ ठोकला होता. पराभव होणार याची जाणीव राष्ट्रवादीला झाली होती. त्यामुळेच संपूर्ण राष्ट्रवादी दडपणाखाली असल्याचे निवडणुकीत पाहायला मिळाले. विजयाचा विश्वास मला होता त्यामुळे मला कोणतेही टेन्शन नव्हते.
या निवडणुकीच्या प्रचारात भाजपाने स्वतःला झोकून दिले होते. भाजपा-शिवसेना पेक्षा दोन पावले पुढे जाऊन प्रचारात उतरली होती. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, मावळचे आमदार बाळा भेगडे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार रामशेठ ठाकूर यांनी मनापासून प्रचार केला. तर शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार, मनोहर भोईर यांनी देखील या निवडणुकीत जोरदार काम केले. त्यामुळेच २ लाख पंधरा हजाराच्या मताधिक्क्याने मला विजय मिळाला.
पिंपरी विधानसभेची जागा शिवसेनेकडे आहे. गौतम चाबुकस्वार हे तिथले आमदार आहेत. गेल्या पाच वर्षात त्यांनी अतिशय चांगले काम केले आहे. लोकसभा निवडणुकीतही पिंपरी विधानसभा मतदारसंघातून चांगले मताधिक्य शिवसेनेला मिळाले आहे. त्यामुळे पिंपरीची जागा ही शिवसेनेकडेच राहील, जागा वाटपाचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेणार असून पिंपरीची जागा शिवसेनेकडेच राहील यासाठी आपण आग्रही असणार असल्याचे बारणे यांनी शेवटी बोलताना सांगितले.






















Join Our Whatsapp Group