पुणे (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज (ता.८) जाहीर झाला. दहावीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली. कोकण विभागाचा ८८.३८ टक्के निकाल लागला. दुसऱ्या स्थानावर कोल्हापूर विभाग राहिला. कोल्हापूर विभागाचा ८२.४८ टक्के लागला आहे.
मंडळामार्फत राज्यात दहावीची परिक्षा राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत १ मार्च ते २२ मार्च दरम्यान घेण्यात आली. दहावीच्या परिक्षेसाठी एकूण १७ लाख ८१३ विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये ९ लाख २७ हजार ८२२ विद्यार्थी तर ७ लाख ७२ हजार ८४२ विद्यार्थिनींचा समावेश आहे.
ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सोमवार दि.१० जूनपासून गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. गुणपडताळणीसाठी संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या स्वस्वाक्षांकित प्रतीसह सोमवार दि.१० जून ते १९ जून पर्यंत अर्ज करता येणार आहे. तर छायाप्रतीसाठी सोमवार दि.१० जून ते २९ जून पर्यंत अर्ज करता येणार आहे.
सर्व विषय घेवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी गुणसुधार योजनेअंतर्गत परीक्षेला पुनश्च प्रविष्ठ होण्याची संधी २००८ पासून लागु करण्यात आली आहे.त्यानुसार विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्ट २०१९ तसेच फेब्रुवारी-मार्च २०२० अशा दोन संधी उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे देखील मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी सांगितले आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळ www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com,या संकेतस्थळावर ऑनलाइन पाहता येणार आहे. तसेच www.mahresult.nic.inया संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकालाबरोबरच वेगळी सांख्यिकी माहीती उपलब्ध होणार आहे.
’एसएमएस’नेही समजणार निकाल
दहावीचा निकाल एसएमएसच्या माध्यमातून मिळविण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना MHSSC स्पेस सीट नंबर टाकून त्यानंतर ५७७६६ या क्रमांकावर एसएमएस केल्यानंतर देखील विद्यार्थ्यांना निकाल समजणार आहे.





















Join Our Whatsapp Group