पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्य पदाचा भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी राजीनामा दिला आहे. महापौर राहुल जाधव यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची समिती असून देखील यात सदस्यांनी सुचवलेले कोणतेच काम होत नाहीत. वर्षानुवर्षे अकार्यक्षम अधिकारी एकाच जागी ठाण मांडून बसले आहेत. प्रशासनाचे याकडे काहीच लक्ष नाही. कामेच होणार नसतील तर या समितीत राहून काय उपयोग? म्हणून आपण सदस्य पदाचा राजीनामा दिल्याचे तुषार कामठे यांनी पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज शी बोलताना सांगितले.
आपल्या राजीनामा बाबत बोलताना तुषार कामठे म्हणाले की, महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर गेल्या दोन वर्षापासून सदस्य म्हणून कार्यरत होतो.सदस्यपदाची जबाबदारी त्यांनी निष्ठेने सांभाळली. परंतु प्रशासनाला या समितीचे महत्त्व नाही. शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची कमिटी आहे.शहर हरित ठेवण्याची जबाबदारी या कमिटीवर आहे. परंतु प्रशासनाला याच्याशी काही देणे घेणे नाही. वर्षानुवर्षे एकच अधिकारी उद्यान अधीक्षक पदावर ठाण मांडून आहे. शहर हरित करण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडून कोणतीही पावले उचलली जातनाहीत. सदस्यांनी सुचविलेल्या सूचनांकडे देखील दुर्लक्ष केले जाते. या कमिटीमध्ये सदस्यांना काहीच महत्त्व नाही. प्रशासनाकडून देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे. म्हणूनच या पदाला योग्य न्याय देता येत नसल्यामुळे सदस्य पदाचा राजीनामा दिला असल्याचे कामठे यांनी सांगितले.
महापालिकेत पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजपाच्या नगरसेवकांची सुरुवातीपासूनच प्रशासनाच्या विरोधात ओरड असल्याचे पाहायला मिळाले. सत्ताधारी नगरसेवकांनी प्रशासनाच्या विरोधात अनेक आंदोलने केली आहेत. आता प्रशासनाच्या कारभाराला कंटाळून नगरसेवक समितीतील सदस्य पदाचा राजीनामा देत असल्यामुळे सत्ताधारी भाजपाची प्रशासनावर पकड नसल्याचे स्पष्ट होत आहे.