पिंपरी (Pclive7.com):- गेल्या काही दिवसांपासून काळभोरनगर परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. वारंवार तक्रारी करूनही महावितरणकडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. येथील विद्युत पुरवठा सुरळीत व अखंडपणे करावा. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेविका मीनल यादव यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
महावितरणच्या शाहूनगर विभागातील मुख्य अधिकाऱ्यांना याबाबत नगरसेविका मीनल यादव यांनी लेखी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, काळभोरनगर येथील सर्वे नंबर ६४, काळभोर इस्टेट व खडीमशीन येथील झोपडपट्टीतील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. गेल्या आठ दिवसापासून तेथील नागरिकांचे वीज पुरवठ्याविना मोठे हाल होत आहेत. वारंवार तक्रारी करूनही तेथील वीजपुरवठा सुरळीत होत नाही. काळभोर इस्टेट येथील अनेक दुकानांचे फेज खराब झाले आहेत. त्यामुळे कारखाने बंद पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
या भागातील समस्येकडे तातडीने लक्ष घालून येथील विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत व अखंडपणे करावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मीनल यादव यांनी दिला आहे.





















Join Our Whatsapp Group