पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात गेल्या आठवडाभरापासून रेबीज लसीचा तुटवडा जाणवत आहे. लस उपलब्ध करुन देण्याबाबत रुग्णालयाच्या मध्यवर्ती भांडार विभागाकडे मागणी करुनही त्याचा पुरवठा केला गेलेला नाही. तसेच, गेल्या एक महिन्यांपासून रेबीज लसचा तुटवडा असल्याने अनेकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्वरीत रेबीज लस उपलब्ध करुन द्यावी, अन्यथा युवासेना पिंपरी विधानसभेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वैद्यकीय अधिकारी पवन साळवे यांच्याकडे निवेदनांद्वारे दिला आहे.
यावेळी जिल्हा समन्वयक रुपेश कदम, युवती सेना अधिकारी प्रतिक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, सनी कड, ओंकार जगदाळे, सूरज पवार, रोहन पिसाळ, श्रेयस घुले, आदित्य पाटील आदी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, वायसीएम रुग्णालयात भोसरी, चाकण, निगडी, पिंपरी, चिंचवड आदी परिसरातून उपचारासाठी नागरिक येतात. लस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी रुग्णालयाची आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तुटवडा जाणवत आहे. त्वरित रेबीज लस उपलब्ध करून द्यावी. अन्यथा युवासेना पिंपरी विधानसभेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलायं.