पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे गुरवमधील राजमाता जिजाऊ उद्यानात ४ कोटी १४ लाख रूपयांचे संगीत कारंजे बसविण्यात येणार आहे. स्थायी समितीने नुकतीच या विषयाला मंजूरी दिली आहे. या प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाला असून या निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचाराची उच्चस्तरिय चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात मारूती भापकर यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपळेगुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात संगीत कारंजे बसविण्यात येणार आहेत. तसेच विद्युत विषयक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. निविदा दर ४ कोटी १४ लाख ९९ हजार रूपये अपेक्षित धरण्यात आला. त्यानुसार, एस. टी. इलेक्ट्रीकल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि एम. बी. इलेक्ट्रीकल्स या दोनच ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यामध्ये एस. टी. इलेक्ट्रीकल्स यांनी निविदा दरापेक्षा ३.०१ टक्के कमी तर एम. बी. इलेक्ट्रीकल्स यांनी ५ टक्के कमी दर सादर केला. नियमानुसार, कमीत कमी तीन ठेकेदारांनी निविदा सादर करणे बंधनकारक आहे. दोनच ठेकेदारांनी निविदा सादर केल्याने निकोप स्पर्धेसाठी महापालिकेने फेरनिविदा मागविणे आवश्यक होते.
उद्यानात संगीत कारंजे बसविण्यासाठी निविदा प्रक्रीयेत दोनच ठेकेदारांनी निविदा सादर केली होत्या. असे असताना फेरनिविदा मागविण्याची तसदी न घेता ४ कोटीचे काम दोन ठेकेदारांपैकी लघुत्तम दर एस. टी. इलेक्ट्रीकल्स या ठेकेदाराचा ४ कोटी २ लाख ५० हजार रूपये हा दर लघुत्तम असल्याने स्थायी समिती व सर्व पक्षीय सदस्यांनी नुकतीच मान्यता दिली. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २६ जून रोजी ही निविदा स्विकारण्यात मान्यता दिली होती. यामध्ये सत्ताधारी, सर्व पक्षीय विरोधक व प्रशासन यांच्यात स्थायी समिती अंडरस्टँडींग होऊन गैरव्यवहार झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात संगीत कारंजे बसविण्याचा ४ कोटी १४ लाखाचा विषय मंजूरीत झालेल्या गैरव्यवहाराची उच्चस्तरिय चौकशी करुन दोषींवर योग्य कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी मारूती भापकर यांनी केली आहे.