पिंपरी (Pclive7.com):- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील जेष्ठ नेते आझमभाई पानसरे यांची ग्रंथतुला करण्यात येणार आहे. तसेच शहराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान मान्यवरांचा सन्मान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते शेखर ओव्हाळ युवामंचच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि.२२ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा सन्मान सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती शेखर ओव्हाळ यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील हे असणार आहेत. तसेच राष्ट्रवादीचे आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे युवानेते शेखर ओव्हाळ युवा मंचच्यावतीने देखील अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शहरातील जेष्ठ नेते आझमभाई पानसरे यांची ग्रंथतुला करण्यात येणार आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरात विविध क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कर्तुत्ववान मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. तर पिंपरीचे शिलेदार या गौरव गाथेचे प्रकाशन धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे.
शेखर ओव्हाळ हे पिंपरी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून तीव्र इच्छुक आहेत. पिंपरीतून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यानुसार त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केलीयं. अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे वातावरण निर्मितीस मदत होणार आहे. जेष्ठ नेते आझमभाई पानसरे हे सध्या भाजपात आहेत. मात्र त्यांचे पुत्र निहाल पानसरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. सध्याच्या परिस्थितीत पानसरे समर्थक भाजपात रमण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे आझमभाई पानसरे यांच्या रूपाने पिंपरीत मोठी ताकद शेखर ओव्हाळ यांच्या पाठीशी उभी राहणार असून शहरातील राजकीय समिकरणे बदलणार असल्याचे संकेत मिळत आहेत.



















Join Our Whatsapp Group