पिंपरी (Pclive7.com):- दि.सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेने आरबीआयच्या परिपत्रकीय निर्देशांकाचे कोणतेही उल्लंघन केलेले नाही. नियमानुसार बँकेचे कामकाज चालू आहे. बँकेच्या कामकाजात कोणतीही अनियमितता झालेली नाही. एक रुपयाचा ही अपहार झाला नाही, असे स्पष्टीकरण बँकेचे अध्यक्ष अँड.अमर मुलचंदानी यांनी आज पत्रकार परिषदेत दिले. तसेच विरोधक केवळ राजकीय द्वेषातून, नैराश्यातून बिनबुडाचे खोटेनाटे आरोप करून बँकेला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या भूलथापांवर ठेवीदार, खातेदारांनी विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये असे आवाहनही अँड.मुलचंदानी यांनी केले.
आरबीआयच्या नियमाप्रमाणे २०१० ते २०१९ या कालावधीत सहा वेळा बँकेचे लेखापरीक्षण झाले आहे. त्यामध्ये बँकेत कोणतीही अनियमितता आढळून आली नसल्याचे सांगत अँड.अमर मुलचंदानी म्हणाले की, धनराज आसवानी आणि त्यांच्या परिवारातील अन्य सदस्यांनी मिळून आजपर्यंत बँके विरुद्ध ३७ केसेस पुणे आणि मुंबई न्यायालयात दाखल केल्या होत्या. बँकेच्या बाजूने या सर्व केसचा निकाल लागला असून सर्व तक्रारी निकाली निघाले आहेत. यावरून आसवानी खोट्या तक्रारी आणि केसेस करून बँकेला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
धनराज आसवानी व इतरांनी सहकार आयुक्तांकडे बँकेच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. त्यावर १४ फेब्रुवारी २०१९ रोजी सहकार आयुक्तांनी सहनिबंधक (लेखापरीक्षण) राजेश जाधवर यांना बँकेचे लेखापरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार दोन महिने लेखापरीक्षणाचे काम चालू होते. यामध्ये बँकेचे संचालक नरेंद्र ब्राह्मणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केली होती. याची तक्रारदार धनराज आसवानी आणि सहनिबंधक राजेश जाधवर यांना माहिती होती. या याचिकेवर १६ एप्रिल २०१९ आणि १३ जून २०१९ रोजी झालेल्या सुनावणीत काही मुद्द्यावर मनाई हुकूम झाला होता. याची या दोघांनाही कल्पना होती. न्यायप्रविष्ट प्रकरण असतानाही सहनिबंधक जाधवर यांनी आसवानी यांना माहितीच्या अधिकारावरील अर्जावर बँकेच्या कर्ज खात्यांची माहिती कागदपत्रे दिली. वास्तविक न्यायप्रविष्ट बाब असतानाही बँकेची माहिती कागदपत्रे देणे नियमाचे उल्लंघन करणारे असल्याचे अँड.मुलचंदानी म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, दि.सेवा विकास को. ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना सन १९७१ मध्ये झाली. ३१ मार्च २०१८ रोजी बँकेकडे प्रत्यक्षात ८२४ कोटी ठेवी होत्या. तर ४ हजार ४७३ खात्यांद्वारे ५०८ कोटींचे कर्ज वाटप केले होते. परंतु तक्रारदार आसवाणी यांनी पोलिस तक्रारीत १०४ खात्यांमध्ये २३८ कोटी रुपयांचे अपहार झाल्याचे नमूद केले आहे. वास्तवात १०४ कर्ज खात्यांपैकी ६६ खात्यात ६६ कोटी १७ लाख रुपये वसूल झाले आहेत. तर उर्वरित खात्यांची कर्जवसुली कायदेशीर प्रक्रिया चालू आहे.
धनराज आसवानी हे राजकीय द्वेषातून बँकेची नाहक बदनामी करत आहेत. सातत्याने आणि वेळोवेळी ते बँकेच्या विरोधात कट कारस्थान करत आहेत. दर तीन-चार महिन्याला बँकेच्या विरोधात काहीतरी करत असतात. ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे व्यापारी आणि गोरगरीब ठेवीदारांचे नुकसान होत आहे. याचे भान देखील धनराज आसवाणी यांना नाही. बँकेच्या दैनंदिन कामकाजाला बाधा पोहोचवण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे. परंतु त्यांच्या खोट्या कारस्थानाला आणि प्रचाराला आम्ही बळी पडणार नाही. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. न्यायालयीन लढाईत आम्हीच जिंकू असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे असे अँड.अमर मुलचंदानी शेवटी बोलताना म्हणाले.






















Join Our Whatsapp Group