पिंपरी (Pclive7.com):- अपघातग्रस्त वासरु पिंपरी महापालिकेच्या प्रवेशव्दारावर ठेऊन बजरंग दलाने आंदोलन केले. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मोकाट जनावरं, गायी, गुरांचा प्रश्न मांडण्यात आला. मात्र त्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. तसेच जखमी जनावरे नेण्यासाठी पालिकेकडे कोणतीच यंत्रणा नाही याबाबींचा निषेध नोंदवत हे आंदोलन करण्यात आलं असं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. एका मोटारीच्या डिक्कीमधून हे वासरु आणले गेले त्यानंतर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर या वासराला बसवून बजरंग दलाने आंदोलन केले. वासराच्या जखमांवर मलमपट्टी करण्यात आली होती मात्र ते घाबरले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, डुकरांच्या लसीकरणासाठी त्यांना पकडण्यासाठी महापालिका ही शेकडो रुपये मोजत आहे. भटके कुत्रे आणि डुकरांवर मोठ्या प्रमाणावर निधी महापालिका उपलब्ध करून देत आहे. मात्र, गोमातेच्या संरक्षणासाठी निधी उपलब्ध होत नाही. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत गोरक्षणाबाबचा प्रश्न हाणून पाडला आहे. याच गोष्टीचा निषेध म्हणून आज अपघातग्रस्त झालेल्या वासराला महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आणण्यात आले होते. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. त्यामुळे जखमी वासरू भेदरलेले होते. यावेळी सुरक्षा रक्षक आणि बजरंग दलाचे कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. दरम्यान, मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा या पेक्षा तीव्र आंदोलन करून जनावरे महापालिकेच्या दारात आणू असा इशाराही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिला.






















Join Our Whatsapp Group