पिंपरी (Pclive7.com):- एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला गळती सुरू असताना आगामी विधानसभा निवडणुकीत दोन हात करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दंड थोपटलेत. एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमधून निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या रविवार दि.२२ रोजी होणार आहे. काळेवाडी येथे सायंकाळी ५ वाजता, बालाजी मंगल कार्यालयात राष्ट्रवादीच्या ‘जाहीर मेळावा’ आयोजित केला आहे.
अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्यास अमोल मितकरी, पार्थ पवार, शेख सुबानअली महंमदअली हे प्रमुख पदाधिकारी, वक्ते मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थितीत राहणार आहेत. सर्व आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने मेळाव्यास उपस्थितीत रहावे. असे राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते, आजी माजी आमदारांचे सेना-भाजपात आऊटगोईंग सुरू आहे. मात्र राज्यभर राष्ट्रवादीचा झंझावात कायम असल्याचे शिवस्वराज्य यात्रेला मिळालेल्या भरघोस प्रतिसादातून दिसून येत आहे. त्यातच निवडणुक आचारसंहिता लागण्यापूर्वीच राष्ट्रवादीने उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली आहे. लोकसभेत पार्थ पवार यांचा झालेल्या पराभवानंतर अजितदादांनी पुन्हा कंबर कसली आहे. पिंपरी चिंचवडचा गड परत काबिज करण्यासाठी व्युहरचना आखली असून पिंपरी, चिंचवड आणि भोसरीत तगडे उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न त्यांचा राहणार आहे.
आता उद्या होणाऱ्या मेळाव्यात अजितदादा काय आक्रमता दाखविणार? आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यावर काय टीका करणार हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान अजित पवार उद्या राष्ट्रवादीचे उमेदवार जाहिर करणार का? याकडेही सर्वांचेच लक्ष लागले आहे.






















Join Our Whatsapp Group