पिंपरी (Pclive7.com):- निवडणूक आयोगाने आज (शनिवार) दुपारी आचारसंहिता महाराष्ट्रात लागू झाल्याची घोषणा केली. देशभरात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी सरकारी वाहने जमा केली. महापौर राहुल जाधव यांनी महापालिका मुख्यालयात येऊन सरकारी वाहन जमा केले. त्यानंतर स्वत:च्या रिक्षातून महापौर जाधव निवासस्थानी रवाना झाले. यावेळी नगरसेवक समीर मासुळकर हे त्यांच्या सोबत होते.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना सरकारी वाहने जमा करणे बंधनकारक आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता, विविध विषय समित्यांच्या सभापतींच्या दिमतीला सरकारी वाहने असतात. या पदाधिकाऱ्यांनी सरकारी वाहने जमा केली.
आज दुपारीच महापौर राहुल जाधव महापालिका मुख्यालयात दाखल झाले. त्यांनी आपल्या वापरातील सरकारी वाहन जमा केले. त्यानंतर चक्क रिक्षा चालवत महापौर घरी रवाना झाले. निवडणूक आचारसंहिता संपेपर्यंत पदाधिकाऱ्यांना सरकारी वाहन वापरता येत नाही.