पिंपरी (Pclive7.com):- ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहे. पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघापैकी पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेससाठी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु आहे. जागा वाटप होण्यात विलंब होत असल्यामुळे वरिष्ठांचे आदेश येईपर्यंत वेळ वाया न घालवता पिंपरी विधानसभेसाठी रविवारी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ करणार असल्याचे पिंपरी चिंचवड शहर असंघटीत कामगार काँग्रेसचे अध्यक्ष सुंदर कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.
सुंदर कांबळे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, असंघटीत कामगार काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बुधवारी (दि.२४) पिंपरीतील कार्यालयात बैठक झाली. यावेळी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मागणी केली की पिंपरी राखीव मतदारसंघातून सुंदर कांबळे यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवावी. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुंदर कांबळे म्हणाले की, २०१२ ते २०१७ या कालावधीत महानगरपालिकेत काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष म्हणून होता. तर राज्यात आणि केंद्रात काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी केली होती. पिंपरी चिंचवड शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे लाखो मतदार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला देण्यात आला होता. या निवडणुकीत पिंपरी राखीव मतदारसंघ काँग्रेसला मिळावा ही शहरातील सर्व काँग्रेसप्रेमींची मुख्य मागणी आहे. काँग्रेस श्रेष्ठींनी शहरातील काँग्रेसच्या मतदारांचा आदर राखून पुढील काळात काँग्रेस पक्ष वाढविण्याच्या उद्देशाने पिंपरी विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला घेणे संयुक्तीक ठरेल. शहरातील सर्व ज्येष्ठ, युवक आणि महिला कार्यकर्त्यांची मागणी विचारात घेऊन पिंपरी विधानसभेसाठी काँग्रेसच्या प्रचाराचा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा व शहराध्यक्षांच्या उपस्थितीत शुभारंभ करू. प्रचाराच्या या शुभारंभ कार्यक्रमास शहरातील काँग्रेसच्या सर्व सेलच्या पदाधिकारी, सर्व महिला कार्यकर्त्यांनी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे रविवारी (दि.२९) सकाळी १०.३० वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन असंघटीत कामगार काँग्रेसचे अध्यक्ष सुंदर कांबळे यांनी केले.