पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. पिंपरी मतदारसंघ हा तसा भाजपचा पारंपारिक बालेकिल्ला. मात्र, महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेला सुटला. त्यामुळे भाजपकडून प्रबळ इच्छुक उमेदवार अमित गोरखे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पिंपरी मतदारसंघातून सुशिक्षित व प्रतिभावंत उमेदवार म्हणून अमित गोरखे यांचे नाव पुढे आले आहे. मात्र, युतीच्या वाटाघाटीत मार्ग न निघाल्याने अमित गोरखे यांना मतदारसंघातील नागरिक, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अपक्ष का होईना रणसंग्रामात उडी घ्यावी लागली. सद्य स्थितीत अमित गोरखे यांना हा मतदारसंघ अनुकूल असाच आहे.
याबाबत अमित गोरखे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी आजपर्यंत सामान्य लोकांसाठी झटलो, आता त्यांच्यासाठी मला समाजकारण करायचय. याच समाजकारणासाठी मी पिंपरी विधानसभेतून निवडणूक लढवणार आहे. माझ्या विरोधात कुणीही लढू द्या. त्यांना अधिकार आहे. मात्र, मला भीती नाही. माझ्यासाठी ही खूप ऐतिहासिक गोष्ट आहे. ही मी घेतलेली मोठी उडी आहे मात्र, मला चिंता नाही, कारण जनता माझ्या पाठीशी आहे. पिंपरी मतदारसंघात परिवर्तन घडवण्यासाठी मी राजकारणात आलो आहे. अपक्ष लढण्याचा हा निर्णय माझ्या स्वतःसाठी नाही तर, मला जनतेसाठी आणि लोकांच्या न्याय हक्कासाठी निवडणूक लढवायची आहे.
निवडणुकीच्या निमित्ताने मी निवडणूक लढवावी की नाही, याबाबत मतदारसंघातील युवा, थोर, जेष्ठ तसेच विविध संघटना आदींकडून मतं जाणून घेतली. यावेळी मला अनेकांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह केला. मला लहानपणापासूनच राजकारणाची आवड आहे. माझी आई अनुराधाताई गोरखे यांचे समाजकारण मी लहानपणापासून जवळून पाहिले. आज त्या नगरसेविका आहेत. या निमित्ताने त्या प्रभागातील लोकांची जनसेवा करीत आहेत. त्यांच्या व मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने मी पिंपरी विधानसभेतून निवडणूक लढविण्याचा चंगच बांधला आहे. त्यासाठी पूर्ण तयारीनिशी व ताकदीनिशी मी रणांगणात उतरलो आहे. आता माघार नाही. जनतेच्या आशीर्वादाने मी विजयश्री खेचून आणणारच, असा विश्वास गोरखे यांनी बोलताना व्यक्त केला.























Join Our Whatsapp Group