पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार आणि महाआघाडीच्या पुरस्कृत अपक्ष उमेदवारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला आहे. मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागसकर यांनी याबाबतची अधिकृत घोषणा आकुर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे, महाआघाडीचे चिंचवडचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे आणि भोसरीतील उमेदवार विलास लांडे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. आहे. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, विरोधी पक्षनेते नाना काटे, दत्ता साने, माजी उपमहापौर राजू मिसाळ, प्रभाकर वाघेरे, प्रशांत शितोळे, नगरसेविका निकिता कदम, मनसेच्या महिला आघाडीच्या अश्विनी बांगर, रुपेश पटेकर, राहुल जाधव, विभाग अध्यक्ष मयुर चिंचवडे, अंकुश तापकीर, दता देवतरासे, विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत डांगे, उपाध्यक्ष बाळा दानवले, राजू सावळे, विशाल मानकरी आदी उपस्थित होते.
बाबु वागसकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात आमची लढाई असून मनसेचे कार्यकर्ते तीनही मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय होणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने राज्यात १०६ ठिकाणी उमेदवार दिले आहेत. जिथे उमेदवार दिले नाहीत. तिथे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, महाआघाडीच्या पुरस्कृत उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिले आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे आणि महाआघाडीच्या पुरस्कृत उमेदवारांना मनसेने पाठिंबा जाहीर केला आहे. कोणत्याही अटी-शर्थीविना हा पाठिंबा देण्यात आला आहे. राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी मनसेला पाठिंबा दिला असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रचाराचा शेवटचा आठवडा राहिला आहे. त्यामुळे महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार रॅली, पदयात्रेत मनसेचे कार्यकर्ते सक्रीय होतील. हिरिरीने प्रचारात सहभागी होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले