पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेचे महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभेत अनधिकृत बांधकाम आणि रिंगरोड बाधित घरांच्या मुद्द्यावरून काहींनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. याप्रकरणी गोंधळ घालणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
येत्या २१ तारखेला विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यानिमित्त राज्यात सर्वत्रच प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. चिंचवड विधानसभेचे महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ आज भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची थेरगावमध्ये जाहीर सभा होती. मात्र या सभेत पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकाम आणि रिंगरोड बाधित घरांच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडे यांचे भाषण सुरू असताना काही नागरिकांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. यात काही महिलांचाही समावेश होता. त्यानंतर पोलिसांनी या गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेऊन सभेच्या ठिकाणावरून बाहेर काढले.
त्यानंतर काहीकाळ सभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र परिस्थितीत योग्य पध्दतीने हाताळत पंकजा मुंडे म्हणाल्या की, लोकशाहीत अशा गोष्टी अपेक्षित असतात. हा विरोधकांचा डाव असल्याचे स्पष्ट होतयं. या शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची वीस वर्षे एखादी सत्ता होती. मग त्यांना इथले स्थानिक प्रश्न का सोडवता आले नाही. आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शहरातील प्रलंबित प्रश्न सोडवले जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसने जाणीवपूर्वक अशा प्रकारचा गोंधळ करण्यासाठी हे लोक पाठवले असल्याचे त्यांनी भाषणात म्हटले.






















Join Our Whatsapp Group