पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना विजयासाठी केवळ लीड मोजायचे आहे. येथील मतदार विरोधकांना लोकसभा निवडणुकीत दिलेल्या दणक्यापेक्षा मोठा दणका विधानसभा निवडणुकीत देणार आहेत. इथला मतदार आपले मत वाया घालवणार नाही. त्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप हे दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येतील, असा ठाम विश्वास राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी (दि. १३) थेरगावमध्ये व्यक्त केला.
चिंचवड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ थेरगाव येथील कैलास मंगल कार्यालयात आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी भाजप -शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, भाजप खासदार अमर साबळे, महापौर राहुल जाधव, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, अमोल थोरात, नगरसेवक अभिषेक बारणे, कैलास बारणे, नगरसेविका माया बारणे, अर्चना बारणे, झामाबाई बारणे यांच्यासह भाजप-शिवसेनेचे सर्व नगरसेवक, भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
पंकजा मुंडे म्हणाल्या, “चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादीला उमेदवार सुद्धा देता आले नाहीत. त्यामुळे निवडणुकीत त्यांचा आधीच पराभव झालेला आहे. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांच्या धास्तीनेच विरोधकांना उमेदवार सापडत नाहीत, हे सिद्ध झाले आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात आमदार लक्ष्मण जगताप यांचा विजय निश्चित आहे. त्यांनी मिळालेल्या मतांचे फक्त लीड मोजायचे आहे. शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना जेवढे मतदान पडणार आहे, तेवढ्या मताधिक्याने ते निवडून येणार आहेत. पिंपरी-चिंचवडमधील लोक अत्यंत हुशार आहेत. या हुशार लोकांनी लोकसभेला जेवढा दणका दिला त्यापेक्षा मोठा दणका विधानसभेला देणार आहेत.
येथील जनता राष्ट्रवादीला जागा दाखवून देईल. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवडचा स्मार्ट सिटीत समावेश झाला. अमृत योजनेअंतर्गत शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी भाजप सरकार कटिबद्द आहे. मराठा आरक्षणांसह अनेक महत्त्वाचे निर्णय सरकारने घेतले. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येणार आहे. त्यामुळे मतदारांनी आपले मत वाया घालवू नये. आमदार जगताप यांचाही विजय निश्चित आहे. त्यांच्या विजयाचीच ही सभा आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयाची विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्ती होणार आणि आमदार जगताप हे दो लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार, असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला.”






















Join Our Whatsapp Group