तळेगाव (Pclive7.com):- रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार सुनिल शेळके यांनी मावळ भागातील विविध गावांचा दौरा करून मतदारांशी सुसंवाद साधला. ग्रामस्थांनीही त्यांच्याशी मनमोकळी चर्चा करून आपल्या अडी-अडचणी मांडल्या. यावेळी मावळ तालुक्याचा संपूर्ण कायापालट करण्याचे आश्वासन सुनिल शेळकेंनी दिले. ग्रामस्थांनी आपला संपूर्ण पाठिंबा शेळकेंना जाहीर केला आणि प्रचंड मताधिक्क्याने निवडून आणण्याची ग्वाही दिली.
रविवारी सकाळपासूनच सुनिल शेळकेंचा प्रचारदौरा सुरु झाला. सकाळच्या सत्रात टाकवे, शिलाटणे, दहिवली, वेहरगाव, कार्ला, वाकसाई या गावंमधून शेळके यांचे उत्साहात स्वागत झाले. ठिकठिकाणी रांगोळ्यांचे सडे, फटाक्यांची आतषबाजी, हलगी-ताशांचा कडकडाट, महिलावर्गाकडून औक्षण अशा प्रसन्न वातावरणात सुनील अण्णांची पदयात्रा सुरु झाली. गावा-गावात राष्ट्रवादीचे झेंडे फडकत असल्यामुळे सर्व गावे जणू ‘राष्ट्रवादीमय’ झाली होती.
कार्ला महालक्ष्मी नवरात्र सांस्कृतिक मंडळाच्या वतीने स्वागत आणि सत्कार करण्यात आला. या प्रचार दौऱ्यात शेळके यांच्या समवेत मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, खरेदी विक्री संघाचे माजी सभापती बाळू भानुसघरे ,पंचायत समिती सदस्य महादू उघडे, नाणे मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजू देवकर, माजी सरपंच किरण हुलावळे, नंदू हुलावळे, कैलास हुलावळे, बाळू हुलावळे, सतीश सावळे, राजू हुलावळे, सचिन वाडेकर, नितिन वाडेकर आदी उपस्थित होते. वाकसाई गावातही शेळके यांचे जल्लोषात स्वागत झाले.