पुणे (Pclive7.com):- बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांचा जामीन अर्ज सत्र न्यायाधीश जयंत राजे यांनी शुक्रवारी फेटाळून लावला.
कुलकर्णी दाम्पत्य, त्यांची नातेवाईक सई वांजपे यांच्या विरोधात फसवणूक प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणात जामीन मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केला होता. कुलकर्णी दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सरकार पक्ष तसेच बचाव पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर कुलकर्णी दाम्पत्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. वांजपे यांच्या जामीन अर्जावर देखील अद्याप निर्णय झालेला नाही.
कुलकर्णी यांनी बँकेकडून १८४ कोटी रुपये कर्ज घेतले होते. गृहप्रकल्प बांधणीसाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम कुलकर्णी यांनी नातेवाइकांच्या बँकखात्यावर वळविली. कुलकर्णी यांना नियोजन न करता आल्याने ते अडचणीत आले, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी केला होता. कुलकर्णी यांच्या वतीने अॅड. श्रीकांत शिवदे यांनी बाजू मांडली. कुलकर्णी यांच्या सर्व कंपन्या नोंदणीकृत आहेत. त्यांनी वेळोवेळी कर जमा केला होता. सरकार पक्षाकडून कुलकर्णी यांच्या कंपन्या काल्पनिक होत्या तसेच त्या नोंदणीकृत नव्हत्या, असा दावा करण्यात आला होता. सरकार पक्षाचा तो दावा पूर्णपणे चुकीचा आहे. कुलकर्णी यांचे वय तसेच त्यांची प्रकृती विचारात घेऊन न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करावा, असे अॅड. शिवदे यांनी युक्तिवादात नमूद केले होते.






















Join Our Whatsapp Group