पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील जेष्ठनेते आझमभाई पानसरे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा सुख:द धक्का मिळाला आहे. आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आकुर्डीत संपन्न झाली. त्या बैठकीला आझमभाई पानसरे यांनी पुत्र निहाल यांच्यासह हजेरी लावली.
आझमभाई पानसरे हे पिंपरी चिंचवड शहरातील वजनदार नेते म्हणून परिचित आहेत. शहरातील राजकारणात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. पानसरे हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अंत्यत निकटवर्तीय म्हणून देखील ओळखले जात होते. राष्ट्रवादीकडून महापौर, स्थायी सभापती, शहराध्यक्ष अशी महत्वाची पदे भूषविली आहेत. लोकसभेची निवडणुक देखील त्यांनी राष्ट्रवादीकडून लढविली होती. मात्र २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या भाजपातील प्रवेशामुळे राष्ट्रवादीला निवडणुकीत मोठा फटका बसला होता. मात्र महापालिकेत सत्ता मिळवून दिल्यानंतर देखील भाजपाने पानसरे यांचे राजकीय पुनर्वसन केले नव्हते. म्हणूनच ते गेल्या काही वर्षापासून भाजपावर नाराज असल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जाहिर पाठींबा देखील दिला होता. मात्र अधिकृतपणे त्यांनी भाजप सोडल्याचे जाहीर केले नव्हते. मात्र आज आझमभाई पानसरे यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत दाखल होऊन व्यासपीठावर हजेरी लावली. त्यांच्या उपस्थितीमुळे सर्वांनाच सुख:द धक्का बसला असून येत्या काळात ते राष्ट्रवादीत सक्रिय होतील असे बोलले जात आहे.
























Join Our Whatsapp Group