पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी चोरट्यांनी चक्क दारूच्या दुकानावर डल्ला मारला आहे. दुकानातून चोरट्यांनी वेगवेगळ्या कंपनीच्या ३१ दारुच्या बाटल्या चोरून नेल्या आहेत. हा प्रकार बुधवारी (दि.१) रात्री पावणेअकरा ते गुरुवारी (दि.२) सकाळी दहाच्या दरम्यान विशालनगर, काळेवाडी येथे घडला.

सिध्देश हरीश लालवाणी (वय ३०, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लालवाणी यांचे विशालनगर, काळेवाडी येथे वाईन शॉप आहे. बुधवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास लालवानी यांनी वाईन शॉप बंद केले. त्यानंतर, अज्ञात चोरट्याने शटर उचकटून शॉपमध्ये प्रवेश केला. वेगवेगळ्या कंपनीच्या ७१ हजार २१० रुपयांच्या दारुच्या ३१ बाटल्या तसेच रोख रक्कम, एक डीव्हीआर व हार्ड डिस्क चोरून नेली. गुरुवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.





















Join Our Whatsapp Group