पिंपरी (Pclive7.com):- पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महापालिका देखील ‘लाईट हाऊस’ प्रकल्प राबविणार आहे. नुकत्याच झालेल्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीमध्ये ‘लाईट हाऊस’ या प्रकल्पाला सभापती निर्मला कुटे यांच्या अध्यक्षतेखाली मंजूरी देण्यात आली.
या प्रकल्पा अंतर्गत तरुण युवक, युवतींना मोफत प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करुन देण्यात येणार आहे. या बहुउद्देशीय प्रकल्पाचा सर्व खर्च सीएसआरच्या निधीमधून केला जाणार आहे. तसेच यासाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग नियुक्त केला जाणार आहेत. यासंदर्भात माहिती देताना निर्मला कुटे म्हणाल्या की, चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच युवकांच्या प्रगतीसाठी असा निर्णय पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच घेण्यात आला आहे. यामध्ये प्रशिक्षण दिलेल्या लाभार्थींपैकी ५० टक्के लाभार्थींना ६ महिन्यात रोजगार उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संस्थेची असणार आहे. प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प एका भागात यशस्वी झाल्यास शहरातील अन्य भागात देखील याच प्रमाणे हा प्रकल्प राबवला जाणार आहे.