
पिंपरी (Pclive7.com):- नागरिकांच्या सुरक्षेसाठी रुपीनगर येथील मुख्य रस्त्यावरील उच्चदाब व कमीदाबाची विद्युत वाहिनी भूमिगत करण्यात यावी अशी मागणी शिवसेना व युवासेना रुपीनगर शाखेतर्फे करण्यात आली आहे.
शिवसेनेचे सतीश मरळ, नितीन बोंडे, युवासेनेचे सचिन सानप, अमित शिंदे यांनी महावितरणच्या रास्तापेठ पुणे येथील मुख्य अभियंता कार्यालय याबाबत निवेदन दिले आहे. प्रवीण पाटील, राहुल पिंगळे, गणेश इंगवले, सहदेव चव्हाण, किशोर शिंदे, रमेश पाटोळे, गणेश भिंगारे आदी यावेळी उपस्थित होते.
रुपीनगर येथील श्री सोमेश्वर मंदिर ते ज्ञानदीप विद्यालय व महाविद्यालय हा रुपीनगरमधील मुख्य वर्दळीचा रस्ता आहे. रुपीनगरकडे जाणारी सर्वच वाहतूक या रस्त्याने जाते. शिवजयंती, रामनवमी व गणपती विसर्जन अशा मिरवणुका याच रस्त्याने जातात. याच रस्त्यावर या उच्च व कमी दाबाच्या विद्युत वाहिन्या आहेत. या विद्युत वाहिन्या तीस वर्ष जुन्या असल्यामुळे तिची जमिनीपासूनची उंची कमी होत गेली आहे. गेल्या वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत यातील विद्युत वाहिनीचा धक्का लागून अपघात झाला होता. रुपीनगरच्या आजूबाजूच्या परिसरातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना किंवा मोठा अपघात होऊ नये यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी रुपीनगर येथील मुख्य रस्त्यावरील उच्चदाब व कमीदाबाची विद्युत वाहिनी भूमिगत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.






















Join Our Whatsapp Group