पिंपरी (Pclive7.com):- आकुर्डी येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या चेंबरचे झाकण गेली कित्येक दिवस तुटलेल्या अवस्थेत होते. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे आज या चेंबरच्या तुटलेल्या झाकणामुळे मोठा अपघात होणार होता. मात्र येथील युवा फाऊंडेशनच्या तरुणांच्या सतर्कतेमुळे होणारा अपघात टाळला आहे. या तरूणांनी तात्काळ या तुटलेल्या चेंबरच्या भोवती दगडी ठेवत होणारे अपघात टाळले आहेत.
युवा फाऊंडेशनच्या रोहित घंटे, श्रीकांत कचरे, अभिषेक सावंत, राज मुलानी, मयुर कदम या तरूणांनी ही कामगिरी केली असून महापालिका प्रशासनाने त्वरीत याठिकाणी दुरूस्ती करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत बोलताना युवा तरूण रोहित घंटे म्हणाले की, आकुर्डीतील या मुख्य रस्त्यावर सतत रहदारी असते. गेल्या कित्येक दिवसांपासून या ठिकाणचे चेंबरचे झाकण तुटलेल्या अवस्थेत होते. पालिका प्रशासनाकडून याची दुरूस्ती होणे अपेक्षित असताना या चेंबरकडे दुर्लक्ष केले जात होते. आज मात्र याठिकाणी ते झाकण जास्तच तुटल्याने त्या चेंबरमध्ये कोणीही व्यक्ती तसेच वाहनचालक पडून अपघात झाला असता. ही गोष्ट आमच्या लक्षात येताच आम्ही तरूणांनी याठिकाणी चेंबरच्या बाजूने सुरक्षेसाठी दगडी ठेवली. त्यामुळे येथे होणारा अपघात टळला आहे. आतातरी महापालिका प्रशासनाला जाग यावी आणि त्वरित या चेंबरचे दुरुस्ती करावी अशी मागणी आम्ही करत आहोत.