
पिंपरी (Pclive7.com):- ट्रॅव्हल्स तसेच खासगी कंपन्यांच्या गाड्यांच्या पार्किंगमुळे पिंपरी चिंचवडमधील बहुतांश सर्व रस्ते व्यापले जात आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी होऊन अपघातांना निमंत्रण मिळत आहे. ही स्थिती बदलून नागरिकांना दिलासा देण्यासाठी ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडे उपलब्ध असलेले मोकळे भूखंड ट्रॅव्हल्स तसेच खासगी कंपन्यांच्या गाड्यांच्या पार्किंगसाठी उपलब्ध करून दिल्यास रस्त्यांवर केले जाणारे बेशिस्त पार्किंग बंद होईल. त्यामुळे प्राधिकरणाकडे असलेले मोकळे भूखंड पार्किंग टर्मिनलसाठी लिलाव पद्धतीने भाडे तत्त्वावर देण्यात यावेत, अशी सूचना चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) प्रमोद यादव यांना केली आहे.
यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्राधिकरणाचे सीईओ प्रमोद यादव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी चिंचवडमधील बहुतांश सर्व रस्त्यांचे रुंदीकरण करून वाहतुकीसाठी प्रशस्त करण्यात आले आहेत. शहरातील नागरिकांना वाहतूककोंडीला सामोरे जाऊ लागू नये आणि त्यांच्या वेळेची व इंधनाची बचत व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. परंतु, रस्त्यांच्या रुंदीकरणाचा फायदा वेगळ्याच कारणांसाठी उचलला जात आहे. ट्रॅव्हल्स तसेच खासगी कंपन्यांच्या गाड्यांनी रस्त्यांवर एकप्रकारे कब्जाच केला आहे.
ट्रॅव्हल्स तसेच खासगी कंपन्यांच्या गाड्या बेशिस्तपणे रस्त्यांवर पार्किंग केले जात आहे. परिणामी रस्ते रुंद असूनही वाहतूककोंडीचे चित्र सर्वत्र दिसत आहे. तसेच अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे शहरातील रस्ते रुंद आणि प्रशस्त असूनही त्याचा उपयोग काय?, असा प्रश्न शहरातील सामान्यांना पडला आहे. त्यामुळे रस्त्यांवर ट्रॅव्हल्स तसेच खासगी गाड्यांचे केले जाणारे पार्किंग कायमस्वरूपी बंद होणे गरजेचे आहे. त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्राधिकरणाच्या मोकळ्या भूखंडांवर पार्किंग टर्मिनल विकसित केल्यास चांगली उपाययोजना होईल.
प्राधिकरणाकडे अनेक मोकळे भूखंड उपलब्ध आहेत. हे भूखंड ट्रॅव्हल्स तसेच खासगी गाड्यांच्या पार्किंगसाठी लिलाव पद्धतीने भाडे तत्त्वावर उपलब्ध करून देणे शक्य आहे. त्यावर प्राधिकरण प्रशासनाने कार्यवाही केल्यास शहरातील सर्व रस्ते पार्किंगऐवजी फक्त वाहतुकीसाठी उपलब्ध होतील. त्यामुळे प्राधिकरणाचे मोकळे भूखंड पार्किंग टर्मिनलसाठी भाडे तत्त्वावर लिलाव पद्धतीने देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना आमदार जगताप यांनी केली आहे.”






















Join Our Whatsapp Group