पिंपरी (Pclive7.com):- सध्या जगभर थैमान घालणाऱ्या ‘करोना’ हा व्हायरस आता भारतातही दाखल झाला असून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महापालिका रुग्णालयांमध्ये स्वतंत्र अतिदक्षता कक्ष उभारावा. तसेच या आजारासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करावी अशी मागणी भाजपाचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे. यासंदर्भात नगरसेवक वाघेरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेत निवेदन दिले. आणि या विषाणूसंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशीही मागणी केली आहे.

यासंदर्भात नगरसेवक वाघेरे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेक देशांमध्ये ‘करोना’ व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. चीनच्या वुहान शहरातून हा जिवघेणा व्हायरस इतर देशांमध्ये पसरला आहे. अमेरिका, भारत, जापान, ऑस्ट्रेलिया, थायलंड, फ्रान्स, सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनाम अशा देशांमध्ये या ‘करोना’ व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या जीवघेण्या व्हायरसमुळे जगभरात आत्तापर्यंत तब्बल २०० लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतामध्ये सद्यस्थितीला केरळ मध्ये करोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आलेला असून त्याला केरळ मधील विलगीकरण केलेल्या कक्षामध्ये भरती केले गेलेले आहे.
आपल्या पिंपरी चिंचवड उद्योगनगरीमध्ये असंख्य नागरिक बाहेरून दाखल होत असतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये नवीन ‘करोना’ विषाणू रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तत्काळ स्थापन करण्यात यावा तसेच आरोग्य व वैद्यकीय विभागामार्फत या विषाणूचा प्रादुर्भाव प्रतिबंध व नियंत्रणासाठी जनजागृती करून योग्य त्या उपाययोजना त्वरित राबविण्यात याव्यात, अशी मागणी नगरसेवक वाघेरे यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group