पुणे (Pclive7.com):- मुंबईमध्ये आज मनसेच्या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. गिरगाव ते आझाद मैदान हा मोर्चा निघणार आहे. या भव्य मोर्चासाठी राज्यभरातून मनसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहेत. मोर्चानंतर अध्यक्ष राज ठाकरे सभेत मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. या सभेसाठी आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सगळ्यात मनसेच्या मोर्चाला भाजपने पुण्यातून पाठिंबा दिल्याचं एक चित्र समोर आलं आहे.
आजच्या मनसेच्या मोर्चाला भाजपचे पाठबळ आहे हे लपून राहिलेलं नाही. कारण पुण्यात ज्या गाड्यातून मनसैनिक मुंबईसाठी रवाना होत आहेत. त्यातील एका बसवर पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचं नाव लिहिण्यात आलं आहे. महेश लांडगे यांच्या समर्थकांची ही गाडी असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मनसेच्या मोर्चाला भाजपचाही पाठिंबा असल्याची चर्चा रंगू लागलीयं.
दरम्यान, मुंबईतल्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावा या मागणीसाठी मनसेच्या मोर्चाला भाजप कामाला लागलं असून मनसेच्या मोर्च्यात भाजपचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजप आता मनसेला मदत करणार असल्याचं बोललं जातं आहे. तसे आदेशच भाजप नेत्यांकडून भाजपच्या मुंबईतील कार्यकर्त्याना देण्यात आले आहेत. याच मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप आमदार आशिष शेलार यांची भेट झाल्याची माहिती मिळत असून, भाजपने या मोर्च्याला अधिक बळकटी मिळावी यासाठी आपल्या कार्यकर्त्याना मोर्चात सहभागी होण्याचे आदेश दिले असल्याचं समजतयं.
दरम्यान या मोर्च्यात भाजपच्या नेत्यांनी सहभागी व्हायचे की नाही हे अजून ठरलेले नसून, भाजपचे मुंबईचे कार्यकर्ते मात्र मनसेच्या मोर्च्यात सहभागी होणार आहेत. त्यात पुण्यातील बसचा हा फोटो सध्या चर्चेचा विषय बनला आहे.