पिंपरी (Pclive7.com):- गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी चिंचवड शहरात एटीएम फोडण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. रहाटणी येथील कुणाल हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावरील आरबीएल बँकेच्या एटीएमवर चोरट्यांनी डल्ला मारला. हा प्रकार आज, बुधवारी (दि.१२) सकाळी उघडकीस आला आहे. गॅस कटरच्या सहाय्याने हे एटीएम फोडले असून मशीनमधून रक्कम चोरून नेली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणीत कुणाल हॉटेलच्या मागील रस्त्यावर आरबीएल बँकेचे एटीएम आहे. बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने हे एटीएम फोडले आहे. चोरट्यांनी एटीएम फोडून रक्कम लंपास केली आहे. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बँकेकडून एटीएममध्ये किती रक्कम होती, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
काही दिवसांपूर्वीच वाकड पोलीसांच्या हद्दीत एटीएम फोडल्याचा प्रकार घडला होता. यामध्ये गॅस कटरने एटीएम फोडताना एटीएम जळाले होते. त्यानंतर पुन्हा आज गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी वाकड पोलीस तपास करीत आहेत.





















Join Our Whatsapp Group