पुणे (Pclive7.com):- ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ तसेच सोप्या भाषेत वैद्यकीय ज्ञानाचा प्रसार करणारे लेखक डॉ. हणमंत विद्याधर ऊर्फ ह. वि. सरदेसाई (वय ८६) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी डॉ. कुंदा, मुलगा डॉ. सुहृद, कन्या अमला, जावई भरत फाटक आणि नातवंडे असा परिवार आहे. डॉ. सरदेसाई यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.
वैद्यकीय ज्ञान सोप्या भाषेत पोहोचविण्यासाठी त्यांनी विपुल लेखन केले. ‘घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती’ हे त्यांचे पुस्तक गाजले.डॉ. सरदेसाई यांचा जन्म १० एप्रिल १९३३ रोजी मुंबई येथे झाला. मुंबईमध्ये १९५५ साली एम. बी. बी. एस. आणि १९५८ मध्ये एम. डी. (मेडिसिन) झाल्यावर उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेले. एमबीबीएसला त्यांना प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन आणि फॉरेन्सिक मेडिसिन या विषयांत विशेष श्रेणी, तर स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र विषयात सुवर्णपदक मिळाले होते. मेंदू, मज्जासंस्था आदींशी निगडित न्यूरॉलॉजी या विषयात एम.डी. करून १९६० ला ते भारतात परतले. कार्यक्षेत्र म्हणून पुण्याची निवड करताना त्यांनी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अध्यापन कार्य केले.
विद्यार्थिप्रिय प्राध्यापक असा त्यांचा लौकिक होता. मराठी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. डॉ. सरदेसाई यांना वेगवेगळ्या रूपांतील गणेशमूर्ती जमा करण्याचा छंद होता. त्यांच्याकडे चित्र आणि शिल्प रूपातील गणपतींचा संग्रह होता. प्रखर बुद्धिमत्तेच्या जोडीला असलेले संवादकौशल्य, रुग्णांविषयी वाटणारा उमाळा आणि रुग्णांना आदराने वागविण्याच्या स्वभावाच्या बळावर डॉ. सरदेसाई यांनी जवळपास सहा दशकांहून अधिककाळ वैद्यकीय व्यवसाय करत ‘धन्वंतरी’ हे नाव सार्थ केले. त्यांनी केवळ संवाद साधल्यानंतर रुग्णाचा निम्मा आजार बरा व्हायचा






















Join Our Whatsapp Group