पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील पान टपऱ्या बंद करण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा जगताप यांनी केली आहे.

यासंदर्भात महापालिका आयुक्तांना युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात ज्या ज्या ठिकाणी ‘पान टपरी’ आहेत, त्या त्या ठिकाणी गोवा, गुटखा, सिगारेट, पान या गोष्टींचे अधिक सेवन करतात त्यामुळे याचठिकाणी अधिकचे धुम्रपान होते. गोवा, गुटखा व पान खाल्ल्यानंतर लोक सर्वत्र ठिकाणी थुंकतात. “कोरोना व्हायरस” हा संसर्गजन्य आजार आहे असे म्हटले जाते. त्यामुळे जर कोणी बाधित असेल किंवा कोणाला काही आजार असेल तर, यामुळे संसर्ग होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. धुम्रपान करण्याचे प्रमाणही शहरात जास्त प्रमाणात आहे. काही ठिकाणी तर अधिकृत स्मोकिंग झोन आहेत. त्यामुळे त्यातूनही येणाऱ्या धुराद्वारे जो धुम्रपान करत नाही, त्या सामान्य माणसाला देखील संसर्ग होऊ शकतो.
कोरोना व्हायरसमुळे आपल्या शहरात गेल्या दोन आठवड्यात रुग्णांची संख्या ९ वर पोहचली आहे. त्यात रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून पिंपरी चिंचवड शहरात चित्रपट गृहे, उद्याने, व्यायाम शाळा, शॉपिंग मॉल्स त्याचबरोबर शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आलेले आहेत. त्याच धर्तीवर शहरातील पान टपऱ्याही काही दिवस बंद करण्यात याव्यात, कारण शहरात काही नामांकित अशा पान टपऱ्या आहेत. तसेच एस.टी स्टॅन्ड, कॉलेजेस याठिकाणी जवळपास ५० – ५० लोकं येऊन गर्दी करतात, त्यामुळे त्याठिकाणी जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो, म्हणून अन्न पुरवठा विभागातर्फे विशेष पथक नेमूण तशी यंत्रणा राबवावी व जे पान टपरी धारक “पान टपरी बंद”करणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आयुक्तांना निवेदन देताना युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा जगताप, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर, सामाजिक न्याय विभाग महिला अध्यक्षा गंगा धेंडे, नगरसेविका अनुराधा गोफणे, नगरसेविका निकिता कदम, नगरसेविका सुमन पवळे आदी मान्यवर उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group