पिंपरी (Pclive7.com):- मागील काही दिवसांपासून देशभरामध्ये कोरोना विषाणू संसर्गामुळे हाहाकार माजला आहे. या विषाणूचा प्रसार महाराष्ट्रसह पुणे, पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील झाला आहे. देशामध्ये सर्वांत जास्त रुग्ण महाराष्ट्रामध्ये सापडले आहेत. त्यांच्यावर राज्य सरकार व मनपाच्या वैद्यकीय विभागाकडून योग्य ते उपचार चालू आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पूर्ण देशामध्ये १४ एप्रिल पर्यंत टाळेबंदी (संचारबंदी) लागू केली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा चालू आहेत, यामुळे राज्यातील उद्योग धंदे ठप्प झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला मिळणारे उत्पन्नही कमी झाले आहे. राज्याची आर्थिक घडी बिघडली आहे. कोरोनाचे संकट आणि टाळेबंदीमुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात झालेली घट लक्षात घेऊन तसेच कोरोना विरुध्दच्या लढ्याला नैतिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी शिवसेनेच्या सर्व नगरसदस्यांचे माहे मार्च महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणार असल्याची माहिती शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी दिली.
यासंदर्भात राहुल कलाटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना कळविले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिवसेनेचे ९ नगरसदस्य आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सूचनेनुसार प्रत्येक नगरसेवक सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांना सर्वतोपरी मदत करत आहे. प्रभागात औषध फवारणी तसेच गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप नगरसेवकांकडून केले जात आहे. दरम्यान शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांचे माहे मार्च २०२० महिन्यांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणार आहोत. तरी या सर्व नगरसेवकांच्या मानधनाचा एकत्रित रकमेचा धनादेश देण्यात यावा अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.






















Join Our Whatsapp Group