पिंपरी (Pclive7.com):- कोरोना आलायं.. दारात थुंकू नका.. लहान मुलं खेळतात.. असं म्हटलं म्हणून त्याचा राग मनात धरून चौघांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. पिंपरी चिंचवड शहरातील वाकडमधील काळाखडक झोपडपट्टीत हा प्रकार घडला आहे.
सचिन भगवान कांबळे (वय २५, रा. अण्णाभाऊ साठे कमान काळाखडक वाकड) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर याप्रकरणी विठ्ठल सुभाष शिंदे (वय २३), बाळकृष्ण सुभाष शिंदे (वय ४५), दत्तात्रय राजाराम खंडागळे (वय ४०), नण्या उर्फ जय बाळकृष्ण शिंदे (वय १९) सर्व राहणार काळाखडक झोपडपट्टी वाकड यांच्याविरुद्ध वाकड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सचिन कांबळे हे त्यांच्या कुटुंबासमवेत घरी होते. त्यावेळी त्यांच्या शेजारी राहत असलेले विठ्ठल शिंदे हे त्यांच्या दारात येऊन थुंकले. यावर कांबळे यांनी शिंदे यांना जाब विचारला. दारात थुंकू नका, कोरोना आला आहे. लहान मुले खेळतात असे म्हटले. याचा राग आल्याने विठ्ठल शिंदे यांनी त्यांच्या नातेवाईकांना बोलून सर्वांनी मिळून सचिन कांबळे यांच्या घरात जबरदस्तीने घुसून त्यांना व त्यांच्या नातेवाईकांस लोखंडी रॉडने, लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून जखमी केले. यासंदर्भात सचिन कांबळे यांनी वाकड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पवार पुढील तपास करीत आहेत.