पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात पूर्वी ज्याप्रमाणे संचारबंदी (लॉकडाऊन) मध्ये कडक नियमाची अंमलबजावणी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे १७ मे पर्यंत शहरात ‘लॉकडाऊन’ची कडक अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.
यासंदर्भात नाना काटे यांनी दिलेल्या प्रसिध्दपत्रकात म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरासह राज्यात संचारबंदी (लॉक डाऊन) दिनांक १७ मे पर्यंत वाढण्यात आलेला आहे. दरम्यान राज्यात तसेच पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणू संक्रमणशील क्षेत्र (कन्टेन्मेंट झोन) वगळता शहराच्या इतर भागामध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय मनपा व पोलिस प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे शहराच्या इतर भागांतील संचारबंदी शिथिल केली असून दुकाने सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यत दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे सोमवार पासून नागरीकांनी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसून आली. नागरीक दुकानांबाहेर मास्क लावून सकाळपासून गर्दी करुन उभे राहिलेले दिसून आले, तर काही ठिकाणी फिजिकल डिस्टन्सचे नियमही पायदळी तुडवित असल्याचे चित्र दिसून आले. काही ठिकाणी नाईलाजाने पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. एकीकडे मनपा प्रशासन व पोलिस प्रशासन कोरोना बाधित रुग्णांची संख्या ओटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे संचारबंदी शिथिल करुन कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढीसाठी प्रोत्साहनच देत आहे, हा विरोधाभासच नव्हे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पुढे म्हटले आहे की, वास्तविक पाहता गेली दिड दोन महिन्यांपासून जे नागरीक प्रामाणिकपणे संचारबंदीचे तसेच महापालिका व पोलिस प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन सर्व प्रकारची काळजी घेऊन घरी बसले आहेत. या संचारबंदी शिथिलतेमुळे नागरीकांनी रस्त्यावर, दुकानात गर्दी करुन कोरोना बाधितांचे रुग्ण वाढल्यास या प्रामाणिक नागरीकांवर अन्याय केल्यासारखे होणार आहे. तसेच पोलिस प्रशासन व मपाचे संचारबंदी शिथिलतेचे आदेशांमध्ये तफावत असल्याचे दिसून येते. कोणत्याही प्रकारची स्पष्टता नाही. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊन नागरीक रस्त्यावर, दुकानांमध्ये गर्दी करीत आहेत. यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढून शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये पूर्वी ज्याप्रमाणे संचारबंदीमध्ये कडक नियमाची अंमलबजावणी करण्यात आली त्याचप्रमाणे १७ मे पर्यंत शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group