पिंपरी (Pclive7.com):- एकीकडे राज्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा देणारी एक बातमी आली आहे. दिवसभरात शहरातील मोशी, रूपीनगर व तपोवनरोड पिंपरीगाव येथील रहिवासी असलेले तब्बल ३४ रुग्ण ‘कोरोनामुक्त’ झाले आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने रात्री उशिरा दिलेल्या माहितीनुसार हे ३४ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना आज (दि.१०) ‘डिस्चार्ज’ देण्यात आला आहे.
गेल्या आठवडाभरापासून पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाच्या रूग्ण संख्येत दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत होती. मात्र आज एक मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. शहरातील मोशी, रुपीनगर, तपोवन रोड पिंपरीगाव येथील कोरोनाबाधित असलेले तब्बल ३४ रुग्ण हे पूर्णपणे बरे झाले आहेत. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून त्यांना आज ‘डिस्चार्ज’ देण्यात आला आहे. शहरात आतापर्यंत कोरोनाचे १६९ रुग्ण आढळले आहेत. त्यातील १०७ रुग्ण ‘कोरोनामुक्त’ होऊन आपापल्या घरी परतले आहेत. आतापर्यंत ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील चार रुग्ण हे पिंपरी चिंचवड शहराचे रहिवासी आहेत. आज रविवारी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण भोसरी येथील रहिवासी होता. या रुग्णावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
दरम्यान आज भोसरी आणि खराळवाडी येथील दोघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये एका ७ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. आज अखेर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात एकूण ५० कोरोना रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत.
दरम्यान, महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून भोसरीतील हुतात्मा चौक, न्यू जनता बेकरी, भोसरी-आळंदी रोड, श्री बालाजी मंदिर, मार्केट रोड, हरेश्वर किराणा स्टोअर्स हा परिसर आज रात्री अकरा वाजल्यापासून सील करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागात पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी आणि या भागातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच या भागातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.























Join Our Whatsapp Group