पिंपरी (Pclive7.com):- आनंदनगरमधील कोरोनाच्या संशयितांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था ऑटो क्लस्टर येथील प्रदर्शन केंद्र १ व २ येथे करावी. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील सर्व प्रभागात मंगल कार्यालय, शाळा, कॉलेज यांचे वर्ग, सभागृह या ठिकाणी देखील रूग्णांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात योगेश बाबर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून आनंदनगर येथे सातत्याने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असून, आनंदनगर भागात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोरोना बाधितांना तातडीने क्वारनटाईन करण्याची आवश्यकता आहे. या विभागात आनंदनगर वगळता मोरवाडी, इंदिरानगर, विद्यानगर, रामनगर, दत्तनगर या नागरी वस्त्या आहेत. या सर्व विभागात कोरोनाचा फैलाव झाल्यास, कोरोना बाधितांचे विलगीकरण करण्यासाठी मध्यवर्ती आणि एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने बेड्सची व्यवस्था करता यावी. त्याकरिता ऑटो क्लस्टर येथील प्रदर्शन केंद्र १ आणि २ येथे व्यवस्था करण्याबाबत महापालिका प्रशासनाने तातडीने विचार करावा.
३१ मे पर्यंत लॉक डाऊन असला तरी पिंपरी चिंचवडला रेडझोन मधून वगळल्यामुळे, उद्योग, व्यापार अशा सर्व स्तरावर अटी/शर्थी सह कामकाज सुरु करण्याबाबत सवलत देण्यात आली आहे. कामासाठी अथवा खरेदीसाठी शहरातील नागरिक बाहेर पडणार असल्यामुळे रहदारी आणि संपर्क वाढणार आहे. पुढील महिन्यापासून पावसाळा सुरु होणार आहे, असे हि पावसाळ्यात साथीचे पेशंट वाढतात. अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग आणि पर्यायाने कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढल्यास, विलगीकरण आणि उपचारासाठी हॉस्पिटल्स मधील बेड्स ची संख्या अपुरी पडण्याची शक्यता आहे. प्रत्येक प्रभागात विलगीकरण आणि उपचारासाठी मंगल कार्यालय, शाळा, कॉलेज यांचे वर्ग आणि सभागृह याठिकाणी व्यवस्था करणे शक्य झाल्यास, संबंधित प्रभागातील कोरोना बाधितांची त्याच विभागात व्यवस्था करता येईल. यामुळे महामारीच्या संकटकाळात, विषयाचे राजकारण होणार नाही तसेच कोरोना बाधितांची योग्य ती व्यवस्था करता येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे कि लॉकडाऊन हा गतिरोधक असून आगामी काळात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन लॉकडाऊनच्या काळात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी Capacity Building करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
याबाबतीत यापूर्वीच प्रभागवार काही नियोजन केले असल्यास ते जाहीर करावे, त्याचा उपयोग नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांना होईल तसेच त्यांच्या सूचना घेता येतील. आपण याबाबतीत तातडीने कार्यवाही करावी आणि तसे जाहीर निवेदन करावे अशी शिवसेना पक्षातर्फे आपणाकडे मागणी करीत आहोत. आगामी काळात कोरोना संसर्ग वेगाने वाढला आणि विलागीकरण आणि उपचार याबाबतीत व्यवस्था अपुरी पडल्यास, नागरिकांमध्ये गोंधळ उडाल्यास आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यास याबाबतीत प्रशासन म्हणून आयुक्त जवाबदार राहतील असा इशारा योगेश बाबर यांनी दिला आहे.























Join Our Whatsapp Group