पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी कॅम्पच्या जवळील भाटनगर, बौद्धनगर व वैष्णव देवी मंदिर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तेथील रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे हे परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहेत. तसेच, सोशल डिस्टन्सिंग व सम-विषम तारखेनुसार कॅम्पातील दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. मात्र, याकडे व्यापाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संपूर्ण कॅम्प परिसर ३१ मे पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (दि.२६) दिला.
पिंपरी कॅम्प परिसरात शगून चौक, कराची चौक, साई चौक, आर्य समाज चौक, गेलार्ड चौक, माता रमाबाई आंबेडकर चौक, डिलक्स चौक, संत गाडगे महाराज चौक, मेन बाजार लेन, रिव्हर रोड, रेल्वे स्टेशन रोड आदी परिसराचा समावेश होतो.
सोशल डिस्टंसिंग नियमाचे पालन करावे, सम-विषम तारखेनुसार दुकाने सुरू ठेवावे, गर्दी टाळावी या अटीनुसार पिंपरी कॅम्पातील दुकाने उघडण्यास आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी परवानगी दिली होती. मात्र, कोणीही नियम पाळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ३१ मेपर्यंत पिंपरी कॅम्पातील सर्व बाजारपेठ बंद ठेवण्यात येत आहे, असे आयुक्त हर्डीकर यांनी आदेशात म्हटले आहे.























Join Our Whatsapp Group