मुंबई (Pclive7.com):- अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याने मंगळवारी दुपारी ११.३० च्या सुमारास चक्रीवादळाचे रूप धारण केले असून, बांगलादेशने सुचवल्याप्रमाणे निसर्ग असे नामकरण झालेले हे चक्रीवादळ आज दुपारी अलिबागजवळ धडकण्याची शक्यता आहे. ताशी १३ किलोमीटर वेगाने हे वादळ पुढे सरकत असून ते जमिनीवर धडकताना ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान, वादळ मुंबईच्या दिशेने वेगाने सरकत असून पहाटे पाच वाजताच्या मुंबईपासून हे वादळ २५० तर अलिबागपासून २०० किलोमीटर अंतरावर होते. त्यानंतर साडेसहा वाजताच्या स्थितीनुसार वादळ मुंबईपासून २०० व अलिबागपासून १५५ किमी अंतरावर आणि साडेसात वाजता हे अंतर अनुक्रमे १९० आणि १४० किमी इतकं कमी झाल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे.
निसर्ग चक्रीवादळ रायगडसह मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत मोठं नुकसान करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागही या वादळाच्या पट्ट्यात येईल, असा अंदाज आहे. गुजरातमधील वलसाड, नवसारी, डांग, सुरत तसेच दमण, दादरा नगर हवेली भागालाही निसर्गचा फटका बसू शकतो. या संपूर्ण भागांसाठी रेडअलर्ट जारी करण्यात आला आहे. या वादळासोबतच मुसळधार पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला असून मुंबईत पूरस्थिती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी पालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल राज्य सरकारच्या यंत्रणांशी समन्वय साधून पावले टाकत आहेत.























Join Our Whatsapp Group