नवी दिल्ली (Pclive7.com):- भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ७६ हजारपर्यंत पोहोचली आहे. मागच्या २४ तासात ९,९८५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. देशाच्या वेगवेगळया भागात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचवेळी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. दरम्यान देशात प्रथमच कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या पुढे गेली आहे. ही एक दिलासादायक बाब आहे.
आतापर्यंत देशात एकूण १ लाख ३५ हजार २०६ रुग्ण कोरोना व्हायरसमधून पूर्णपणे बरे झाले आहेत. १ लाख ३३ हजार रुग्णांवर अजूनही कोरोना व्हायरससाठी उपचार सुरु आहेत. आतापर्यंत एकूण ७,७४५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागच्या २४ तासात २७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशातील कोरोना व्हायरसचा सर्वात मोठा हॉटस्पॉट बनलेल्या महाराष्ट्रात अजूनही कम्युनिटी ट्रान्समिशन सुरु झालेले नाही असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ९० हजारपर्यंत पोहोचली आहे. चीनच्या वुहानला महाराष्ट्राने मागे टाकले आहे. वुहानमध्ये ८४ हजार रुग्ण होते.
मुंबईत एकाबाजूला कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढतेय तर दुसऱ्या बाजूला कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. जून महिन्यातल्या पहिल्या नऊ दिवसात कोरोनामुळे दररोज सरासरी ५३ मृत्यू झाले आहेत. हेच मे महिन्यात शेवटचे नऊ दिवस करोनामुळे दररोज सरासरी ४१ मृत्यू झाले होते.
मे महिन्यातील शेवटच्या नऊ दिवसांच्या तुलनेत जूनमध्ये मृत्यूचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आहे. जून महिन्यात मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत ४८१ मृत्यू झाले आहेत. एक जून रोजी ४० त्यानंतर पुढचे तीन दिवस ४९ मृत्यू झाले. पाच जूनला ५४ सहा जूनला ५८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. मंगळवारी कोरोनामुळे ५८ जणांचा मृत्यू झाला.























Join Our Whatsapp Group