पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महापालिका मुख्यालयातही कोरोनाने शिरकाव केला आहे. कार्यालयातील अधिकारी, नगरसेवक, ठेकेदार, कर्मचा-यांना कोरोनाची बाधा झाली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर हे देखील होम क्वारंटाईन झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर नागरिक, ठेकेदार यांना महापालिकेत बंदी कायम ठेवण्यात आली आहे. १० जुलै पर्यंत ही प्रवेश बंदी वाढविण्यात आली आहे.
या प्रवेशबंदीचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (दि.०२) रोजी काढला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात “कोरोना” विषाणू COVID-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात होत असलेली वाढ, तसेच नगरसदस्य, पदाधिकारी आणि महानगरपालिका कार्यालयांमधील कर्तव्यावरील कर्मचारी, अधिकारी “कोरोना” बाधित होत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेवून करसंकलन विभागीय कार्यालये व प्रभाग कार्यालयातील करभरणा विषयक कामकाज वगळता दिनांक १० जुलै २०२० पर्यंत महानगरपालिका अधिनस्त सर्व कार्यालयांमध्ये नागरीक, ठेकेदार व इतरांना प्रवेश बंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी महापालिकेशी संबंधित कामकाजाकरिता दूरध्वनी, भ्रमणध्वनी, ई-मेल, व्हॉट्सॲपचा वापर करावा. ते ग्राह्य धरुन प्रश्नांचे निराकरण करण्यात येईल, असेही आयुक्तांनी म्हटले आहे. यापूर्वी २० जून ते ३० जून पर्यंत महापालिकेत अशाच प्रकारे प्रवेशबंदी करण्यात आली होती.























Join Our Whatsapp Group