पिंपरी (Pclive7.com):- कोरोना महामारीच्या काळातील शाळेंच्या व शैक्षणिक संस्थांच्या मनमानी कारभारावर राज्य सरकारने अंकुश लावावा. अन्यथा वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरू मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संकेत चोंधे यांनी दिला आहे. यासंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासन अधिकार्यांना निवेदन दिले आहे.
संकेत चोंधे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, एकीकडे कोरोनारुपी महामारीने सर्व जग त्रस्त असतांना शाळेचं व शैक्षणिक संस्थांचं अवाजवी शुल्क वाढ करणे आणि सक्तीची शुल्क वसुली करणे हा सामान्य नागरिंकावर होणार अन्याय आहे. राज्य सरकारने यावर्षीच मे महिन्यात काढलेल्या परिपत्रकात शुल्क वाढ न करणे व शाळा सुरु नसल्यास इतर खर्च न घेणे या गोष्टींचा स्पष्ट उल्लेख केलेला असूनही बहुतांश सर्व शाळांनी व शैक्षणिक संस्थांनी हे नियमच पायदळी तुडवत सक्तीची शुल्क वसुली आणि मागील वर्षीपेक्षा जास्त शुल्क वाढ केलेली आहे. राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकाची कडक अंमलबाजवणी करावी व यात लक्ष घालावे.
भरपूर त्रस्त पालकांनी या विरोधात आवाज उठवला असून शाळेच्या या मनमानी कारभारावर आक्षेप घेतला आहे. पालकांचं असं म्हणणं होतं की जर आमची परिस्थिती ठीक असती तर आम्ही स्वखुशीने शुल्क भरली असती, शेवटी आम्हालाही आमच्या मुलांच्या भविष्याची काळजी आहे. पण डोळ्यासमोर एवढी भयावह परिस्थिती असतांनासुध्दा जर शैक्षणिक संस्था जास्तीची व विनाकारण शुल्क वसुली करत असतील तर आम्ही याविरुद्ध तक्रार करणारच. जे पालक शुल्क भरण्यास असफल ठरले आणि ज्यांनी वाढीव व ज्यास्तीची शुल्क भरण्यास असमर्थता दाखवून विरोध केला अशांना शाळेंनी ऑनलाईन वर्गाची लिंक न पुरवणे, तसेच त्यांच्या पाल्याची शैक्षणिक वर्षातून नाव वगळणे या गोष्टी करण्यात आल्या आहेत. या अशा कारणांनी पालक वर्गात आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता व या मनमानी कारभारविरुद्ध असंतोष निर्माण झाला. काही पालकांमार्फत जेव्हा हा विषय समोर आला तेव्हा संकेत चोंधे पालकांना यामध्ये पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी याबाबतीत शाळेंनी केलीली शुल्क वाढ, काढलेली परिपत्रक व पालकांना पाठवलेली मेल पाहिली आणि त्या माहितीद्वारे त्यांनी लगेच प्रशासनाला यावर कडक कारवाई करण्याची आणि पालकांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली.
यासंदर्भात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना सुद्धा निवेदन दिले आणि यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे. तसेच त्यांनी पिंपरी चिंचवड येथील प्रशासकीय अधिकारी व संबंधित विभागाला सुद्धा या विषयात लक्ष घालून शाळेंच्या व शैक्षणिक संस्थांच्या या मनमानी कारभारावर अंकुश लावण्याची व कारवाई करण्याची विनंती केली आहे. संकेत चोंधे यांनी पालकांना आश्वस्त केले की आपण निश्चिंत राहावे, आम्ही यामध्ये पालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि जोपर्यंत यावर कारवाई होऊन शुल्कवाढ व ईतर शुल्क कमी होत नाही तोपर्यंत हा मुद्दा आम्ही उचलून धरणार. वेळ पडल्यास यासाठी रस्त्यावर उतरू पण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही असही ते म्हणाले. तसेच शाळांनी व शैक्षणिक संस्थांनी सुद्धा या महामारीच्या काळात एक सामाजिक भान ठेऊन केलीली शुल्क वाढ व ईतर शुल्क माघारी घ्यावी व पालकांना सवलत द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.




















Join Our Whatsapp Group