पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेने ‘प्लाझ्मा थेरपी’चा अवलंब करण्यासाठी बरे झालेल्या रुग्णांना ‘प्लाझ्मा दान’ करण्याचे आयुक्तांबरोबर महापौर यांनी आवाहन करावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापौर उषा उर्फ माई ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दररोज शेकडोच्या संख्येतील वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहरात भितीचे वातावरण असतानाच एक दिलासादायक बातमी पुढे आली आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून ‘प्लाझ्मा थेरपी’चा वापर केल्याने १३ कोरोना रुग्ण ठणठणीत बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे ‘प्लाझ्मा थेरपी’ ही रुग्णांना जीवनदान देण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच राज्य सरकारकडून ‘प्लाझ्मा दान’ करणार्या प्रोत्साहन भत्ता म्हणून दोन हजार रुपये देण्याचा निर्णय विचाराधीन आहे. महापालिकेनेही या रकमेप्रमाणे महापालिकेकडून ‘प्लाझ्मा दान’ करणार्यांना काही प्रोत्साहन रक्कम जाहिर करावी. त्यामुळे प्लाझ्मा दान करणारे पुढे येतील, असे संदीप वाघेरे यांनी इमेद्वारे पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पुणे शहरात प्लाझ्मा थेरपीच्या ट्रायल साठी तीन रक्तपेढ्यांना इंडियन कौन्सिल ऑफ मेहिकल रिसर्च (आससीएमआर) कडून मान्यता देण्यात आली होती. तर पिंपरी चिंचवड शहरात वायसीएममधील रक्तपेढीला मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार प्लाझ्मा डोनर बँक तयार करण्यात आली आहे. निकषाची पुर्तता केल्यानंतर रक्तपेढयांना ही मान्यता मिळते. कोरोना रुग्ण बरा झाल्यावर त्यांना प्लाझ्मा दान करता येतो. प्लाझ्मा दान करण्याची प्रकीया ही रक्तदानापेक्षा वेगळी आहे. कोरोना बाधित होवून बरा झालेल्या रुग्णाचे रक्त स्पेल सेपरेटर या मशिनमध्ये घेतले जाते. त्यानूत 400 ते 500 मिली प्लाझ्मा वेगळा केला जातो. त्यानंतर उर्वरीत रक्त पुन्हा संबंधीत प्लाझ्मा दात्याच्या शरीरात सोडण्यात येते. ही प्रकीया रक्तपेढीतच होते. त्यासाठी 40 मिनीटे लागतात. परंतु यासाठी प्लाझ्मा दात्याचा व रुग्णाचा रक्तगट जुळणे महत्वाचे असते.
वायसीएममध्ये व भोसरी रुग्णालयांमध्येही कोरोना काळात धडाडीने काम केलेल्या डॉ. विनायक पाटील यांनी काही रुग्णांना प्रेरित केल्यामुळे 15 ते 20 कोरानातून बरे झालेल्या व्यक्तींनी आपला प्लाझ्मा वायसीएमच्या रक्तपेढीत दान केला. त्यातील बहुतांश लोकांचा प्लाझ्मा मॅच झाला व तो रुग्णांना दिल्यानंतर अवघ्या 24 ते 48 तासात सुमारे 13 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. शहरात दि. 15 जुलै 2020 पर्यंत कोरानातून बरे होवून घरी गेलेल्या रूग्णांची संख्या 5 हजार 235 आहे. परंतु; प्लाझ्मा दान करणारे 15 ते 20 म्हणजे अत्यल्प आहेत. यासाठी जनजागृती करण्याची अत्यंत गरज आहे, अशी त्यांनी मागणी केली आहे. तसेच; जे रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत त्यांचा आपल्याकडे रुग्णालयात माहिती (डाटा) आहे. त्यानुसार त्यांना पत्र पाठवून व मेल तसेच व्हॉटस अॅप द्वारे महापौर आपण व आयुक्तांच्या स्वाक्षरी नुसार प्लाझ्मा दानाचे आवाहन केल्यास मोठ्या प्रमाणात फरक पडून अनेक दाते पुढे येतील व शहारातील हजारो कोरोना रुग्णांचे प्राण वाचून ते आपणास दुवा देतील. तरी माझी कळकळीची विनंती आहे की, आपण तातडीने या कामात लक्ष घालून पलाझ्मा थेरपीबाबत जनजागृती करुन बरे झालेल्या रुग्णांना वृत्तपत्रातून व प्रत्यक्ष पत्र, मेल, व्हॉटस अॅपद्वारे आवाहन करावे, अशी विनंती वाघेरे यांनी महापौरांना केली आहे. निवेदनाची प्रत अतिरक्ति वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वायसीएम रुग्णालयाचे डिन डॉ. राजेश वाबळे यांना पाठविली आहे.























Join Our Whatsapp Group