लोणावळा (Pclive7.com):- १५ ऑगस्ट रोजी स्वांतत्र्यदिनाची सार्वजनिक सुट्टी असल्याने दरवर्षी पर्यटक मोठ्या प्रमाणावर लोणावळ्यात गर्दी करतात. मात्र, यंदा करोनाचं संकट असल्याने पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांना लोणावळ्यात येण्यास सुरुवातीपासूनच मनाई करण्यात आली आहे. मात्र, आता १५ ऑगस्ट रोजी कोणीही लोणावळ्यात येऊ नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. जर पोलिसांची नजर चुकवून याठिकाणी आलेलं कोणी आढळल्यास त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
याबाबत माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव म्हणाले, यावर्षी १५ ऑगस्ट शनिवारच्या दिवशी येत असून दुसऱ्या दिवशी रविवार आहे. त्यामुळे लागून सलग दोन दिवस सुट्ट्या असल्याने या दोन्ही दिवशी लोणावळ्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन लोणावळा पोलिसांनी हे आवाहन केले आहे.
लोणावळा परिसरात सध्या दमदार पाऊस सुरू आहे. परिसरातील धबधबे, धरण, नद्या, ओढे हे ओसंडून वाहत आहेत. येथील परिसर अगदी निसर्गरम्य झाला असून सर्वत्र हिरवळ दिसत आहे. दरवर्षी हेच निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी हजारो पर्यटक स्वातंत्र्य दिनी लोणावळा शहरात गर्दी करतात. परंतु, यावर्षी करोना महामारीचा अडसर असून जिल्हाधिकाऱ्यांनीही आदेशाद्वारे पर्यटकांना पर्यटनस्थळी येण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे लोणावळा पोलिसांनी देखील कंबर कसली आहे, अशी माहिती यादव यांनी दिली आहे.






















Join Our Whatsapp Group