पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर प्रसारमाध्यमांसमोर टीका केली होती. या टीकेनंतर पार्थ पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पार्थ पवार पक्ष सोडणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
पार्थ पवार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. नुकतंच खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत पार्थबद्दल अनेक चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पार्थ वेगळा मार्ग निवडणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आजोबांविरोधात नातू मोठा निर्णय घेणार का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहे.
महाराष्ट्रात भाजपच ऑपरेशन लोटस सुरु?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या घडामोडींवर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघालं आहे. शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना प्रसारमाध्यमांसमोर अपरिपक्व म्हटल्यानंतर राष्ट्रवादीतील शरद पवार आणि अजित पवार हे दोन नेते समोरासमोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याशिवाय पार्थ पवार कोणताही निर्णय आपल्या वडिलांना विचारल्याशिवाय घेऊ शकत नाही. दुसरीकडे राणे कुटुंबाने पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे भाजपचं ऑपरेशन लोटस हे महाराष्ट्रातही सक्रीय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
पार्थ पवार पक्ष सोडणार?
पार्थ पवार काहीतरी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पण पार्थ पवार प्रसारमाध्यमांसमोर अपमान झाला म्हणून पक्ष सोडण्याचा निर्णय घेऊ शकतात, असं मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पार्थ पवार काय म्हणाले होते?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पार्थ यांनी केली होती.
“सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी, ही संपूर्ण देश, विशेषत: तरुणांची हीच भावना आहे. मी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विनंती केली, की राष्ट्रीय भावना विचारात घेऊन सीबीआय चौकशी सुरु करावी” सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या आपल्या ट्वीटमध्ये पार्थ पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केलं होतं. पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेला छेद देणाऱ्या भूमिका दोन वेळा घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.






















Join Our Whatsapp Group