पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड येथील विद्यानगर दत्तनगर परिसरात काल खुनाची घटना घडली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या भागात पोलिसांची गस्त वाढवावी. तसेच परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे त्वरित बसवावेत अशी मागणी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी केली आहे.
यासंदर्भात अनुराधा गोरखे यांनी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.
विद्यानगर – दत्तनगर भागांमध्ये काल खुनाची एक घटना घडली. त्यामुळे या परिसरात अत्यंत भितीचे वातावरण आहे. या खूनाच्या घटनेतील आरोपींना पोलीसांनी त्वरित पकडावे. वेळोवेळी या भागांमध्ये अशा प्रकारचे हल्ले झाले आहेत. त्यामुळे या भागांमध्ये पोलीस गस्त वाढवावी. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित बसवावे अशीही मागणी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी केली आहे.
काय नेमके घडले ?
पूर्ववैमनस्यातून डोक्यात दगडी पाटा घालून तरुणाचा खून करण्यात आला आहे. ही घटना विद्यानगर, चिंचवड येथे हनुमान मंदिरासमोर शनिवारी (दि.२२) घडली. शंकर गोविंद सुतार (२३, रा. हनुमान मंदिरासमोर, विद्यानगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी नीला गोविंद सुतार (वय ४५) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संतोष चौगुले (वय २५), अजय कांबळे (वय २३), मोसीन शेख (वय २५), पप्पू पवार (वय २८, पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांचा मुलगा शंकर सुतार आणि आरोपी यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्याचा राग आरोपी यांच्या मनात होता. शंकर रात्री हनुमान मंदिरासमोर झोपला. त्यावेळी रात्री सव्वाबाराच्या सुमारास आरोपी तेथे आले. झोपेत असलेल्या शंकर याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. तसेच, दगडी पाटा डोक्यात घातला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला पिंपरीतील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.























Join Our Whatsapp Group