पिंपरी (Pclive7.com):- महापालिकेत डॉक्टर भरतीमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा अत्यंत खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी महापालिका सर्वसादारण सभेत केला. एक एका डॉक्टरकडून तब्बल ४० लाख रुपये भाजप पदाधिकाऱ्यांनीच घेतले आहेत, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. दरम्यान, या प्रकरणावर आपण न्यायालयात जाणार आहेत, तसेच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दादा मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे साडेतीन तास या विषयावर जोरदार चर्चा झाली आणि विषय मंजूर करण्यात आला.
महापालिकेच्या पीजी कॉलेजसाठी ७५ डॉक्टरांची भरती आणि कायम नियुक्तीचा विषय गेले सहा महिन्यांपासून चर्चेत आहे. विधी समितीत हा विषय मंजूर होत नसल्याने त्याचवेळी विरोधकांनी भरतीसाठी ४० लाख रुपये विधी समिती आणि भाजपच्या पदाधिऱ्यांचा भाव असल्याचा आरोप केला होता. भाजपच्या वरिष्ठांना पक्षाची बदनामी नको म्हणून हा विषय विधी समितीत मंजूर करण्याचे फर्मान काढले होते. आज तोच विषय महापालिका सभेत मंजूर कऱण्यावरून घमासान झाले. आज महापालिकेच्या तहकूब सभेत या विषयावर चर्चा झाली. सत्ताधारी भाजपने हा विषय मंजूर करायचा असे अगोदरच ठरवले होते. विरोधकांपैकी योगेश बहल यांनी त्यावर बोलताना अत्यंत खळबळजनक आरोप केल्याने सर्वजण अवाक झाले.
आपले मत मांडताना योगेश बहल यांनी सत्ताधारी भाजपवर तोफ डागली. ते म्हणाले, या भरतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. एका एका डॉक्टरकडून तब्बल ४० लाख रुपये खुद्द भाजपच्या पदाधिकाऱ्यानेच जमा केले आहेत. खासगी प्रॅक्टीस करणाऱ्यांना घ्यायचे नाही, वयाची मर्यादा संपलेल्यांना वगळायचे हे यापूर्वीच्या चर्चेत ठरलेले होते. भाजपने जे ठरले ते बाजुला ठेवून विषय रेटून नेला हे बरोबर नाही. आता हेच डॉक्टर वायसीएम मध्ये नोकरी करून स्वतःच्या खासगी हॉस्पिटलमध्ये पेशंट पाठवणार. म्हणजे वायसीएम मधून तिकडे खासगीत पेशंट जाणार. सरकारी सेवेत असताना दुसरी प्रक्टीस करता ये नाही, मात्र तिकडे दुर्लक्ष केले जाते. इथे विषय मंजूर केला तरी या प्रकऱणात मी स्वतः न्यायालयात जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे त्याबाबत गाऱ्हाणे मांडणार आहे, असेही बहल म्हणाले.
दरम्यान, या विषयावर बहल यांना प्रत्युत्तर देताना एकनाथ पवार यांनी सर्व आरोपांचे खंडन केले. ते म्हणाले, बऱ्याच लोकांची दुकानदारी बंद होणार आहे त्यांचाच या विषयाला विरोध आहे. वायसीएम मध्ये ऑक्सिजन पुरवठा कोण करतो, रुबी हेल्थ केअरचे कंत्राट कोणाचे आहे, व्हेंटिलेटर निकृष्ठ पुरविणारे ठेकेदार कोण हे जगजाहीर आहे. कोरोना काळात १०० डॉक्टर नसते तर आपल्या शहरात काय परिस्थिती राहिली असती त्याची कल्पना करा. भरती बद्दल आरोप करणाऱ्यांनी सीआयडी काय सीबीआय चौकशी करा असे आवाहन पवार यांनी दिले.
राहुल कलाटे यांनी या प्रकरणात ७५ कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप केला. मंगला कदम, आशा शेंडगे, बाळासाहेब ओव्हाळ, अजित गव्हाणे यांच्यासह १५ नगरसेवकांनी चर्चेत सहभाग घेतला.























Join Our Whatsapp Group