पिंपरी (Pclive7.com):- गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या बदलीची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर त्यांची बदली झाली असून त्यांच्या जागी भारतीय पोलीस सेवेतील १९९८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या महाराष्ट्र राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून मुंबई येथे कार्यरत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ४५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या आदेशावर आज, बुधवारी स्वाक्षरी केली आहे. पुणे आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस आयुक्तांचीही बदली करण्यात आली नाही. या बदल्यांची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे.
पिंपरी चिंचवडचे मावळते पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई हे पिंपरी चिंचवड शहराचे दुसरे पोलीस आयुक्त होते. आयुक्तालयाचे पहिले आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या जागी बिष्णोई यांची नियुक्ती करण्यात आली होती. पद्मनाभन ऑक्टोबर २०१९ मध्ये निवृत्त होत असल्याने विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची बदली करत बिष्णोई यांच्याकडे पिंपरी चिंचवड शहराची धुरा सोपविण्यात आली होती. पिंपरी चिंचवड शहरात येण्यापूर्वी संदीप बिष्णोई वैधमापनशास्त्र, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे नियंत्रक म्हणून कार्यरत होते.
पिंपरी चिंचवडचे नवीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ज्यांना के पी आयर्नमॅन म्हणून ओळखले जाते. ते झारखंड मधील हजारीबाग येथील आहेत. १९९८ च्या बॅचचे आयपीएस कॅडेट आहेत. सायकलिंग, स्विमिंग, रनिंग यासाठी प्रसिद्ध असलेल्या कृष्ण प्रकाश यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. सतत हसतमुख आणि आपल्या अनोख्या कार्यशैलीमुळे प्रसिद्ध असलेले कृष्ण प्रकाश पिंपरी चिंचवड शहरात आले आहेत. शहरातील गुन्हेगारी रोखण्यात तसेच शहरात पोलिसांचा वचक निर्माण करण्यास ते यशस्वी होतात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.























Join Our Whatsapp Group