पिंपरी (Pclive7.com):- पक्षाने ठरवून दिलेला एक वर्षाचा कार्यकाल संपल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी बुधवारी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. महापौर माई ढोरे यांच्याकडे त्यांनी स्वीय सहाय्यकामार्फत राजीनामा दिला आहे. दरम्यान, नवीन विरोधी पक्षनेता कोण असणार महापालिका वर्तुळात चर्चा रंगली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत पहिल्यांदाच विरोधात बसावे लागल्याने अधिकाअधिक नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नाना काटे यांनी १ ऑगस्ट २०१९ रोजी विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यानंतर त्यांचा एक वर्षांचा कार्यकाल १ ऑगस्ट २०२० रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे पक्षाच्या ठरलेल्या अलिखित नियमानुसार काटे यांनी राजीनामा दिला आहे. काटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे स्वीय सहाय्यकामार्फत त्यांनी महापौर माई ढोरे यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे.
विरोधी पक्षनेतेपदासाठी नगरसेवकांमध्ये चुरसविरोधी पक्षनेतेपदासाठी माजी महापौर वैशाली घोडेकर, माजी उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे, विधी समितीचे माजी सभापती संतोष कोकणे इच्छुक आहेत. त्यांनी हे पद मिळावे यासाठी पक्षाकडे अर्ज केले आहेत. यामध्ये गव्हाणे, मिसाळ, घोडेकर यांच्यात विरोधी पक्षनेतेपदासाठी जोरदार रस्सीखेच निर्माण झाली आहे. या पाचपैकी उपमुख्यमंत्री अजित पवार कोणाला संधी देतील याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.