पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातून महागड्या दुचाकींची चोरी करणारी अंतरराज्यीय टोळी पिंपरी चिंचवड पोलिसांनी जेरबंद केली आहे. याप्रकरणी ७ लाख ५ किंमतीच्या आठ मोटरसायकली हस्तगत करण्यात आले असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने ही कारवाई केली आहे.
अमरेश किसन चव्हाण (वय १ ९ वर्षे, रा.संध्या डुडुळगाव मोशी, पुणे (मुळगाव कर्नाटक), किरण नुरसिंग राठोड (वय २० वर्षे, रा. वडगाव, ता.मावळ, जि.पुणे (मुळगाव कर्नाटक), करण अर्जुन कु-हाडे (वय १९ वर्षे, रा.साईसमर्थनगर, वडगाव, ता.मावळ, जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.०३ ऑक्टोबर २०२० रोजी पहाटेच्या वेळी चिखली पोलीस ठाणे हद्दीतील नेवाळेवस्ती येथुन एकाच वेळी दोन बुलेट मोटार सायकली चोरीस गेल्या होत्या. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या पथकाने गुन्ह्याच्या ठिकाणी व इतर ठिकाणी असलेल्या सी.सी. टिव्ही फुटेजवरून आरोपींचा येण्या जाण्याचा मार्ग काढला. गुन्ह्याच्या ठिकाणचे वेगवेगळ्या मोबाईल टॉवरच्या माहितीवरून आरोपींचा माग काढला.
त्यानुसार आरोपी अमरेश किसन चव्हाण याला पोलिसांनी मोशी येथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आरोपी किरण नुरसिंग राठोड आणि करण अर्जुन कु-हाडे या दोघांना तळेगाव येथुन ताब्यात घेण्यात आले. आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी कर्नाटक राज्यातील दोन साथीदारसह पुणे व पिंपरी चिंचवड परीसरामधुन मोटार सायकली चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी त्यांच्या कर्नाटक येथील आणखी दोन साथीदारांसोबत मिळून पिंपरी चिंचवड शहरातून दुचाकी चोरी करत असल्याचे आरोपींनी तपासात सांगितले. पिंपरी चिंचवड शहरातून चोरलेल्या महागड्या दुचाकी हे चोरटे कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्यातील देवदुर्गा या त्यांच्या गावी विक्रीसाठी घेऊन जात होते.
गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक काळूराम लांडगे यांनी कर्नाटक राज्यात चार दिवस थांबून आरोपींनी लपवून ठेवलेल्या २ बुलेट, ३ एफ झेड, २ पल्सर, १ पॅशन अशा साडेसात लाखांच्या आठ दुचाकी हस्तगत केल्या. या कारवाईमुळे चिखली पोलीस ठाण्यातील २ (बुलेट), तळेगाव दाभाडे २ (एफ झेड), हिंजवडी २ (पल्सर, पॅशन), पिंपरी पोलीस ठाण्यातील एक (पल्सर) वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
अटक केलेल्या आरोपींचे आणखी दोन साथीदार कर्नाटक राज्यात राहतात. तिथून येऊन सर्वजण पिंपरी चिंचवड शहरात फिरून महागड्या दुचाकी चोरत असत. चोरलेल्या दुचाकी कर्नाटक राज्यात विक्रीसाठी घेऊन जात असत. आरोपी करण हा तळेगाव येथील असल्याने त्याला पिंपरी चिंचवड शहराची संपूर्ण माहिती होती. त्यामुळे इतर आरोपी त्याला गाडी चोरी करण्यासाठी तसेच गाडी चालवण्यासाठी घेऊन जात असत.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उप निरीक्षक काळुराम लांडगे, सहाय्यक पोलीस फौजदार रविंद्र राठोड, रविंद्र गांवडे, तसेच पोलीस कर्मचारी बाळु कोकाटे, अमित गायकवाड, महादेव जावळे, सोमनाथ बो-हाडे, सुनिल चौधरी, प्रमोद हिरळकार, सचिन मोरे, अंजनराव सोडगिर, प्रमोद गर्जे, आनंदा बनसोडे, राजेंद्र शेटे, नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे.






















Join Our Whatsapp Group