पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीच्या स्मार्ट एकात्मिक प्रकल्पाअंतर्गत जलनि:स्सारण, पाणीपुरवठा जल मापक बसवणे या ५२० कोटी रुपयांच्या टेंडरमध्ये भाजपाकडून ३०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप शहर शिवसेनेने केला आहे. त्याची दखल घेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या टेंडरची चौकशी करण्याचे आदेश प्रधान सचिवांना दिले आहेत. तसेच त्याचा अहवाल देखील मागविला आहे.
शिवसेना पिंपरी चिंचवड कार्यकारिणीने आज (मंगळवारी) चिंचवड येथे पत्रकार परिषद घेत या टेंडरमधील गोलमालाचा भांडाभोड केला.
जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, महिला संघटिका ॲड. उर्मिला काळभोर, अनंत को-हाळे, बाळासाहेब वाल्हेकर, मच्छिंद्र देशमुख, अनिता तुतारे, आदिक भोसले, हरेश नखाते, अमोल निकम, विवेक तितरमारे, ज्ञानेश्वर शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
योगेश बाबर म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीच्या स्मार्ट एकात्मिक प्रकल्पाअंतर्गत जलनि:स्सारण, पाणीपुरवठा जल मापक बसवणे या कामाची ५२० कोटी रुपयांची निविदा ९ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. टेक महिंद्रा कंपनी लिमिटेड, क्रिस्टल इंटग्रेटेड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड आणि आरसीअस इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्यांना एकत्रितपणे हे ५२० कोटी रुपयांचे टेंडर बहाल करण्यात आले”.
प्रत्यक्षात हे काम केवळ १५० ते २०० कोटी रुपयांचे आहे. त्यामुळे या निविदेत सुमारे ३०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. यात भाजपचे उच्चपदस्थ नेते, शहरातील आमदार, स्मार्ट सिटीचे संचालक आणि भाजप, संघधार्जिणे पालिका आयुक्त यांची मिलिभगत आहे. हे संगनमताने लूट करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
गौतम चाबुकस्वार म्हणाले, स्मार्ट सिटीत बहुमताच्या जोरावर निर्णय घेतले जातात. तथापि, राज्यात सत्तांतर झाल्याने आम्ही आता नगरविकास खात्याकडे दाद मागता आहोत. याबाबत यशस्वी पाठपुरावा करत आहोत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री आहेत. त्यामुळे ते आम्हाला न्याय देतील. आरोपांची वस्तुनिष्ठपणे चौकशी करतील. याची आम्हाला खात्री आहे.






















Join Our Whatsapp Group